कोर ऑफ सिग्नल्सचा ११६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
कोर ऑफ सिग्नल्सचा ११६ वा स्थापना दिवस उत्साहात साजर
माणगांव – भारतीय सेनेचा प्रमुख घटक असलेल्या कोर ऑफ सिग्नल्सची स्थापना दिनांक १५ फेब्रुवारी १९११ रोजी झाली. त्या निमित्ताने दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी कोर ऑफ सिग्नल्सचा ११६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी देशपातळीवरील, प्रामुख्याने तामिळनाडू, गुजरात तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून सिग्नल्स परिवारातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात वीर नायक यशवंतराव घाडगे (५ मराठा लाईट इन्फंट्री बटालियन) यांच्या स्मारकास पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. द्वितीय महायुद्धातील अतुलनीय शौर्यासाठी ब्रिटिश सरकारकडून व्हिक्टोरिया क्रॉस मिळविणाऱ्या या शूर योद्ध्यांना मानवंदना देण्यात आली.
या प्रसंगी दिवंगत हवालदार वसंत अर्जुन पवार यांच्या धर्मपत्नी श्रीमती नंदिनी वसंत पवार यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली. तसेच वय ८० वर्षांवरील ज्येष्ठ माजी सैनिकांच्या हस्तेही पुष्पमाला अर्पण करून त्यांचा गौरव करण्यात आला. माणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.यानंतर रिव्हरलाईन रिसॉर्ट व लॉन, माणगाव येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघाचे जिल्हाध्यक्ष हवालदार वसंत रामचंद्र धामणे (सेवानिवृत्त), श्रीमती नंदिनी वसंत पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुबेदार योगेश बने (सेवानिवृत्त) यांनी केले. सूत्रसंचालन सुबेदार अमोल पिसाळ (सेवानिवृत्त) यांनी केले.अध्यक्षीय भाषणात हवालदार वसंत रामचंद्र धामणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत असा कार्यक्रम साजरा करणे हे आपले परमभाग्य असल्याचे नमूद केले.
या यशस्वी आयोजनासाठी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांचे विशेष आभार मानण्यात आले.यानंतर माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध उपक्रम घेण्यात आले — महिलांसाठी हळदीकुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांच्या स्पर्धा तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले. विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते व लोकगीते सादर करण्यात आली. अखेरीस सर्व उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सन २०२७ मध्ये हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यात आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले.