आ. भास्करराव जाधव यांचे कट्टर समर्थक प्रसिद्ध उद्योजक वसंत उदेग उद्या शिंदे सेनेत प्रवेश करणार

पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती
चिपळूण शिवसेना उबाठा गटाचे नेते व आमदार भास्करराव जाधव यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कळवंडे गावचे सुपुत्र, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व कुणबी समाजाचे नेते वसंत उर्फ दादा उदेग हे उद्या बुधवार दि. 7 जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थांसह जाहीर प्रवेश करणार आहेत.
या प्रवेशामुळे कळवंडे, पाचाड, कोंढे आदी भागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून उबाठा शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. दादा उदेग यांच्यासह या परिसरातील अनेक कार्यकर्ते मोठ्या जल्लोषात
शिवसेनेतून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूणकडे विशेष लक्ष केंद्रीत केले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. नगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेश सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर चिपळूण-संगमेश्वर आणि गुहागर मतदारसंघात संघटनात्मक बांधणीवर भर देत ठाकरे गटाला सुरुंग लावण्याची रणनीती आखण्यात येत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर कळवंडे येथील दादा उदेग व त्यांच्या समर्थकांचा प्रवेश हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे धरणग्रस्त भागातील कळवंडे, कोंढे, पाचाड आदी गावांमधील अनेक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते देखील यावेळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. याशिवाय नारदखेरकी येथे देखील स्वतंत्र प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या दोन्ही कार्यक्रमांमध्ये काही माजी पंचायत समिती सदस्यांचा देखील शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे राजकीय गोटातून सांगण्यात येत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.



