खेडमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी–पादुका परिक्रमेचे भक्तिभावात स्वागत

खेड (ओंकार रेळेकर) भारतीय जनता पार्टी, खेड आणि राजवैभव प्रतिष्ठान, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी समर्थ पालखी–पादुका परिक्रमेचे खेड शहरात भक्तिभावात स्वागत करण्यात आले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या आयोजनाखाली निघालेल्या या पवित्र पालखी–पादुका परिक्रमेचे छत्रपती शिवाजी महाराज चौक, खेड येथे आगमन झाले.
या प्रसंगी विधिवत पूजन करण्यात आले. भाजपा नेते तसेच खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी (वहिनी) वैभव खेडेकर यांनी पालखी–पादुकांचे मनोभावे दर्शन घेऊन पूजन केले. शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्यात सहभाग नोंदवला.
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या संकल्पनेतून गेल्या १९ वर्षांपासून हा श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा सातत्याने संपन्न होत आहे. यंदाही ढोल–ताशांच्या गजरात, विठू नामाच्या जयघोषात आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या घोषणांनी खेड शहर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले. संपूर्ण शहरातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी व पादुका परिक्रमा सोहळा असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात पार पडला. शहरातील नागरिक, भाविक आणि वारकरी यांच्या सहकार्याने हा धार्मिक सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.
