पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
अर्णव शिंदे राज्यात सहावा, रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम; तब्बल ११ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

अर्णव शिंदे राज्यात सहावा, रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम; तब्बल ११ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
देवरूख (ओंकार रेळेकर)महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रीय शिक्षण संस्था, भांडुप संचलित पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल, साडवलीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विविध इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत शाळेची शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता ७ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कुमार अर्णव योगेश शिंदे याने राज्यस्तरावर सहावा क्रमांक पटकावत रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे कुमारी अन्वी निलेश जगुष्टे हिने जिल्ह्यात १३ वा, तर कुमारी कनका लोकेश नोनहरे हिने १५ वा क्रमांक मिळविला.
इयत्ता ४ थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कुमार स्वयम वैभव भोसले याने जिल्ह्यात ६ वा, कुमार साई सुनील केसरकर याने ९ वा, तर कुमार स्वयम विजय नाकाडे याने १२ वा क्रमांक मिळविला. तसेच इयत्ता ५ वीमध्ये कुमार अद्वेत क्षिरसागर याने राज्यस्तरावर १७ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.इयत्ता ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी शर्वरी बांडागळे हिने जिल्ह्यात १० वा, तर कुमारी आयुषी कुर्लिकर हिने २० वा क्रमांक मिळविला. अशा प्रकारे शाळेच्या ११ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या शैक्षणिक यशात भर घातली आहे.
अर्णव शिंदे याचे राज्यातील सहावे आणि जिल्ह्यातील प्रथम स्थान, तसेच अन्य विद्यार्थ्यांची जिल्हा व राज्यस्तरीय कामगिरी ही शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची साक्ष देणारी ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत व सातत्यपूर्ण अभ्यास यांचा मोठा वाटा असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव, माजी आमदार डॉ. सुभाष बने, संस्था संचालक डॉ. रोहन बने तसेच मुख्याध्यापक श्री. सोमीनाथ मिटकरी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.शिष्यवृत्ती परीक्षेतील या दैदिप्यमान कामगिरीमुळे पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल, साडवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, शाळेने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.




