चिपळूण नगर परिषद पशुवैद्यकीय विभाग व राधाई फाऊंडेशनच्या संयुक्त प्रयत्नांना यश
पावणेदोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गाय व वासराचे सुरक्षित गोशाळेत स्थलांतर

पावणेदोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गाय व वासराचे सुरक्षित गोशाळेत स्थलांतर
चिपळूण : बुरूमतळी परिसरात घराच्या दारात गाय व्याल्याची माहिती मिळताच चिपळूण नगर परिषद पशुवैद्यकीय विभाग आणि राधाई फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे तातडीने बचावमोहीम हाती घेतली. नगर परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, राधाई फाऊंडेशनचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर गाय व तिच्या नवजात वासराला सुरक्षितपणे उपचार करुन गोशाळेत हलविण्यात यश आले.
शुक्रवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास बुरूमतळी येथील ऐश्वर्या चितळे यांनी भ्रमणध्वनीवरून पालिका प्रशासनाशी संपर्क साधून त्यांच्या घराच्या दाराजवळ गाय व्याल्याची माहिती दिली. गाय जखमी असून तिच्यासोबत नवजात वासरू असल्याने दोघांनाही तातडीने सुरक्षित स्थळी हलवून उपचार देण्याची विनंती करण्यात आली.
ही माहिती चिपळूण नगर परिषद आरोग्य विभागाचे प्रमुख वैभव निवाते यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तातडीने दखल घेतली. सकाळी आठच्या सुमारास नगर परिषद आरोग्य विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली व राधाई फाऊंडेशन संस्थापक अध्यक्षा राधाताई लवेकर यांना घटना संदर्भात माहीती दिली राधाई फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु केलेले “मोकाट जनावरांबाबत जनजागृती व रेस्कु अभियाना” मार्फत बचावकार्याला तातडीने सहकार्य करण्यात आले.
राधाताई लवेकर तात्काळ घटनास्थळी हजर राहून प्रथम पशुवैद्यकीय अधिकारी यांना फोनद्वारे वैद्यकीय मदत मागवली तसेच राधाई फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अनिकेत साळवी गाईच्या स्थलांतरासाठी वाहन घेऊन घटनास्थळी हजर झाले पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल होताच नवजात वासराची व गाईची पाहणी करून प्रथम उपचार देऊन वासराला सुरक्षितपणे वाहनात ठेवले. मात्र, गाय घाबरल्याने सैरावैरा धावत असल्याने तिला ताब्यात घेऊन वाहनात चढविणे हे मोठे आव्हान ठरले.घटनेची माहीती समजताच भाजपा गटनेते शशिकांत मोदी घटनास्थळी हजर झाले
त्यानंतर नगर परिषद कर्मचारी, राधाई फाऊंडेशनचे कार्यकर्ते, पशुवैद्यकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी समन्वयाने प्रयत्न सुरू ठेवले. तब्बल पावणेदोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर घाबरलेल्या गाईला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात यश आले.
गायीलाही काळजीपूर्वक वाहनात चढवून नवजात वासरासह दोघांनाही सुरक्षित लोटे येथील सरकारमान्य गोशाळेत हलविण्यात आले. सकाळी सव्वाआठ ते दहा वाजेपर्यंत ही बचावमोहीम सुरू होती.
दरम्यान, गाय व वासराला उपचारासाठी सुरक्षित स्थळी हलविताना मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ काही प्रमाणात थांबवावी लागली. या वेळी स्थानिक नागरिक, रिक्षाचालक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी प्रशासनाला सहकार्य करून बचावकार्य सुरळीत होण्यासाठी मदत केली.
या संपूर्ण बचावमोहीमेत समाजसेविका व राधाई फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा राधाताई लवेकर, अनिकेत साळवी, नगरसेवक शशिकांत मोदी, पशुवैद्यकीय अधिकारी, चिपळूण नगर परिषद आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच दीपक किंजळकर, राजेंद्र नवरत, अमित टेरवकर, अनिल खापरे, भास्कर शेटकर, विश्वनाथ मोहिते, अमोल गमरे, उमेश मोहिते, दयानंद मोहिते, संदीप शेडगे, रमेश पवार, राहुल तांबे, नितेश कांबळे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
मूक जनावरांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविता येते, याचे हे बचावकार्य एक उत्तम उदाहरण ठरले आहे.




