महाराष्ट्र

पराग विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सायली राणे यांना आदर्श महापौर शिक्षक पुरस्कार

३२ वर्षांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल; गुणवंत शिक्षक म्हणून गौरव

चिपळूण (ओंकार रेळेकर )महाराष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित पराग विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, भांडुप येथील प्राथमिक विभागात कार्यरत सहाय्यक शिक्षिका सायली राणे यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे आदर्श शिक्षक व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त दत्तात्रय वारे यांच्या हस्ते आदर्श महापौर शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांच्या ३२ वर्षांच्या शैक्षणिक सेवेतून त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ आणि सामाजिक बांधिलकी यांची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन सभागृहात आयोजित समारंभात मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते मुंबईतील ५० गुणवंत व प्रयोगशील शिक्षकांना आदर्श महापौर शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रत्येक शिक्षकाला ११ हजार रुपयांचे पारितोषिक, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व फेटा देऊन गौरविण्यात आले.
सायली राणे या शिस्तप्रिय, कार्यतत्पर आणि विद्यार्थिप्रिय शिक्षिका म्हणून परिचित आहेत. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, गणवेश, पुस्तके आणि वह्या यांसाठी त्या आर्थिक मदत करतात. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या परिसरात गृहभेटी देऊन पालकांशी संवाद साधतात. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.
अभ्यासू आणि तंत्रज्ञानस्नेही शिक्षिका म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी विविध शैक्षणिक व्हिडिओ आणि पीपीटी तयार केल्या असून, उत्कृष्ट निवेदनशैलीमुळे त्यांचे विशेष कौतुक केले जाते. सन २०२३-२४ मध्ये त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला होता. तसेच, तालुकास्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत २०२३ मध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. याशिवाय त्यांनी तालुकास्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे.
शाळेच्या गुणवत्ता विकासातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शाळेत एसक्यूएएएफ (SQAAF) प्रमुख म्हणून काम करताना शाळेला राज्यस्तरीय ‘अ’ दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच, शाळेचा उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळांच्या यादीत समावेश व्हावा, यासाठी सरल पोर्टलच्या माध्यमातून शाळेची गुणवत्ता अधोरेखित करण्यास त्यांनी हातभार लावला.
शैक्षणिक गुणवत्ता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांविषयीची आत्मीयता आणि समाजसेवेची आवड या गुणांचा गौरव म्हणजे सायली राणे यांना मिळालेला हा पुरस्कार होय. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, पराग विद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

फोटो : आंतरराष्ट्रीय दर्जाचे आदर्श शिक्षक व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त दत्तात्रय वारे यांच्या हस्ते महापौर पुरस्कार स्वीकारताना सायली राणे यांच्यासह उपमहापौर संजय घाडी आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!