
चिपळूण (ओंकार रेळेकर)’माझं गाव आरोग्य संपन्न असले पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी. आरोग्यविषयक तक्रारींवर योग्य उपाय जाणून घेऊन शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती पोहोचली पाहिजे. गाव ते राज्य पातळीपर्यंत सर्वांनी या मोहिमेत मिशन म्हणून सहभागी व्हावे,’ असे आवाहन गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले.
चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी सकाळी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या वेळी जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, संजय कदम, दीप्ती महाडिक, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती बापू आयरे, सदस्य शौकत माखजनकर, विनोद झगडे, तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमात डॉ. अजय सानप व डॉ. ज्योती यादव यांनी आरोग्यविषयक विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. आमदार जाधव यांनी सांगितले की, या मोहिमेत सहभागी होणाऱ्या व उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत, त्यामुळे सर्व गावांनी उत्साहाने सहभाग घ्यावा. तसेच मुलींमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या एचपीव्ही लसीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. ही लस अधिकाधिक मुलींनी घ्यावी, यासाठी लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवावी, असेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य पर्यवेक्षक आर. के. पवार, नारायण शिंगवा, मनोहर तायडे, विनायक हेगडे, काका चव्हाण, आरोग्य सहाय्यक एस. वाय. जानवलकर आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन इकबाल चौगुले यांनी केले.
फोटो : आ.भास्कर जाधव यांचा सत्कार करताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)



