खेर्डी कातळवाडीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रशासनाला निर्देश
युवासेना सरचिटणीस उमेश खताते यांच्या पाठपुराव्याला यश; २६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर

चिपळूण (ओंकार रेळेकर)खेर्डी येथील डोंगराळ भागात वसलेल्या कातळवाडीतील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आता प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री श्री. उदय सामंत साहेब यांनी कातळवाडीच्या पाणीप्रश्नाची गांभीर्याने दखल घेत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. युवासेना सरचिटणीस श्री. उमेश खताते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रश्नाला आता निर्णायक दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
खेर्डी कातळवाडी ही डोंगराळ भागात आणि गावापेक्षा उंच ठिकाणी वसलेली वाडी आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्येला वारंवार सामोरे जावे लागते. ग्रामपंचायतीच्या बोअरवेलच्या माध्यमातून वाडीला पाणीपुरवठा केला जात असला, तरी उपलब्ध पाणीपुरवठा व्यवस्था अपुरी पडत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात कातळवाडीतील नागरिकांना पाण्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागला. सणासुदीच्या दिवसांतही पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ ही नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरली.
नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन युवासेना सरचिटणीस श्री. उमेश खताते यांनी पालकमंत्री श्री. उदय सामंत साहेब यांच्याकडे कातळवाडीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पंचायत समितीचे उपसभापती श्री. संदेश आयरे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना खेर्डी येथे पाठवून प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षण करण्यास सांगितले.
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये सध्या अस्तित्वात असलेली दोन इंची पाणीपुरवठा पाइपलाइन बदलून तीन इंची पाइपलाइन टाकल्यास कातळवाडीतील पाणीपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, असे निदर्शनास आले. त्यानुसार पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून या कामासाठी सुमारे २६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले.
त्यानंतर श्री. उमेश खताते यांनी संबंधित अंदाजपत्रक व आवश्यक पत्रांसह पालकमंत्री श्री. उदय सामंत साहेब यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कातळवाडीतील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईची सविस्तर माहिती देत हा प्रश्न केवळ तात्पुरता न सोडवता कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी केली. नागरिकांना वारंवार पाण्यासाठी संघर्ष करावा लागू नये, यासाठी आवश्यक पाइपलाइनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या मागणीची दखल घेत पालकमंत्री श्री. उदय सामंत साहेब यांनी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला संबंधित कामाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कातळवाडीतील नागरिकांना भविष्यात नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम मार्गी लागावे, हा उमेश खताते यांचा प्रयत्न
कातळवाडीतील पाणीप्रश्न हा अनेक वर्षांपासून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. पिण्याचे पाणी ही मूलभूत गरज असून, त्यासाठी महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागू नये, यासाठी या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून श्री. उमेश खताते यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पाणीपुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
आता पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनंतर संबंधित विभागाकडून पुढील कार्यवाही होऊन २६ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकानुसार प्रस्तावित कामाला मंजुरी मिळावी आणि प्रत्यक्ष पाइपलाइनचे काम लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा कातळवाडीतील नागरिक व्यक्त करत आहेत.
कातळवाडीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा आणि प्रत्येक घरापर्यंत नियमित पाणी पोहोचावे, यासाठी आपण कटिबद्ध असून, संबंधित विभागांकडे आपला पाठपुरावा सुरूच राहील, अशी भूमिका श्री. उमेश खताते यांनी घेतली आहे.
या कामाला अंतिम मंजुरी मिळून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यास कातळवाडीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या पाणीसमस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.




