मासिक आवर्त ठेव योजनेतून दरमहा १० कोटींचा संकल्प संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांची माहिती
सहकार भवनात उत्साहीपूर्ण वातावरणात पार पडला सहकार मेळावा!


चिपळूण नागरीची कार्यपद्धती खेडोपाड्यात पोहोचावी, यासाठी सन २००७ मध्ये समन्वयक ही संकल्पना सुरू करण्यात आली. या संकल्पनेला चांगले यश मिळाले आहे. चिपळूण नागरीच्या ठेव योजना सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचल्याने बचतीची सवय लागली आहे. सध्या साडेसहा ते साडेसात कोटी मासिक आवर्तक ठेव योजनेच्या माध्यमातून संकलित होत असून तर आता सन २०२७ पर्यंत १० कोटी तसेच ९२ कोटी भाग भांडवलचा संकल्प चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी संस्थेच्या ‘सहकार भवन’ सभागृहात आयोजित सहकार मेळावा प्रसंगी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबईचे एस. बी. पाटील, माजी सहनिबंधक लेखापरीक्षण महाराष्ट्र राज्य पुणे चे तानाजी कवडे, चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण, ऍड. नयना पवार, गुलाब सुर्वे, सत्यवान म्हामुनकर, सोमा गुडेकर, प्रकाश पत्की, रवींद्र भोसले, प्रकाश साळवी, प्रमोद साळवी, राजेंद्र पटवर्धन, खेडच्या सहाय्यक निबंधक श्रीमती योगिता मुरडे आदी उपस्थित होते.यावेळी ते पुढे म्हणाले की, सहकारातून समृद्धी आणण्यासाठी पतसंस्था एक महत्त्वाचे माध्यम आहे . या क्षेत्रात आपण चांगलं काम केलं तर सगळं परिवर्तन होऊ शकतं. चिपळूण नागरीच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील अगदी मजुरी करणाऱ्या माणसाला सुद्धा अर्थसहाय्य करून त्याला उभं करण्यासाठीची ताकद देण्याचे काम झाले आहे. याचबरोबर कितीतरी कुटुंब असतील की ज्यांना आपण संस्थेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलं आणि त्या कर्जाच्या माध्यमातून छोटे- छोटे व्यवसाय करून स्वावलंबी झाले आहेत. चिपळूण नागरीने स्थापनेपासूनच ‘आपली माणसं, आपली संस्था’, या ब्रीद वाक्याला अनुसरून कामकाज केले आहे, असे सांगताना संस्थेच्या आतापर्यंतच्या आर्थिक वाटचालीचा परामर्ष घेतला. तर आतापर्यंत आपण सर्वांनी सहकार्य केले आहे. ते सहकार्य अखंडितपणे असेच पाठीशी राहू दे, असे आवाहन सुभाषराव चव्हाण यांनी शेवटी केले.
सहकार चळवळ पतसंस्थेपुरती मर्यादित राहता कामा नये- एस. बी. पाटील
यावेळी सेवानिवृत्त अप्पर आयुक्त एस. बी. पाटील यांनी आपल्या मनोगतात चिपळूण नागरीने संस्थेच्या स्थापनेपासून सर्वसामान्यांना बचतीची सवय लावलेली आहे. इतकेच नव्हे तर कर्जासाठी पुढे येऊन छोट्या – छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व्हा, असे उघडपणे आवाहन करून हा जो पारदर्शकपणा- मोकळेपणाचा पायंडा संस्थेने जपला आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. केंद्र सरकारने सन २०२५ मध्ये राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर केले. याबरोबरच आपापल्या राज्याचे धोरण तयार करावे, अशा प्रकारच्या केंद्र शासनाचे निर्देश आल्यावर प्रत्येक राज्याने आपापल्या समिती गठीत केलेल्या आहेत. तशी समिती सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये आपला समावेश आहे. पुढच्या २०-२५ वर्षात आपली सहकार चळवळ वृद्धिवंत होण्याचा विचार करण्यात आला आहे. सहकार चळवळ केवळ पतसंस्थेपुरती मर्यादित न राहता लोकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग राहिला पाहिजे. देश – महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता सहकारात सभासद संख्येत मोठी ‘गॅप’ आहे, याची आकडेवारी देऊन ती भरून काढण्यासाठी आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन श्री. पाटील यांनी यावेळी केले.
चिपळूण नागरीने सभासदांचा विश्वास टिकवून ठेवला–तानाजी कवडे
माजी सहनिबंधक लेखापरीक्षण महाराष्ट्र राज्य पुणे चे तानाजी कवडे यांनी आपल्या मनोगतात चिपळूण नागरी पतसंस्थेची वाटचाल गौरवास्पद असून संस्थेने आर्थिक व्यवरार्यता संभाळताना सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. ‘आपली माणसं, आपली संस्था’ या ब्रीदवाक्यप्रमाणे संस्था कार्यरत असून संस्थेचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. चिपळूण नागरीचा निव्वळ नफा सुमारे २२ कोटी इतका आहे. तसेच सलग २७ वर्ष सभासदांना १५ टक्के लाभांश देणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्थांमध्ये चिपळूण नागरीचा नामोल्लेख होईल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे कौतुक करताना चिपळूण नागरीने ग्राहक- सभासदांचा विश्वास टिकवून ठेवला आहे. संस्थेने गेल्या ३२ वर्षात पारदर्शक व्यवहार ठेवलेला आहे. यामुळे संस्था दिवसेंदिवस प्रगतीपथावर पोहोचली आहे. चिपळूण नागरीने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. सभासदांचा विश्वास हा कोणत्याही संस्थेची खरी ताकद आहे. संस्थेने शिस्त, प्रामाणिकपणा जपत यशोशिखर गाठले आहे. चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या कार्यपद्धतीचे श्री. कवडे यांनी कौतुक केले. तसेच पतसंस्थेच्या वाटचालीस मागील तीन वर्षात तीन मानाचे शिरपेच रोवले गेले आहेत, ही बाब कौतुकास्पद असल्याचे तानाजी कवडे यांनी यावेळी नमूद केले. तर ते आणखी पुढे म्हणाले की, सहकार हा केवळ आर्थिक व्यवहारांचा विषय नाही. तर तो परस्पर विश्वास आणि सामूहिक प्रगतीचा विषय आहे. एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक ही भावना सहकारातून सहकाराच्या मुळाशी आहे. याच पद्धतीने चिपळूण नागरीचे कामकाज सुरू असल्याचे श्री. कवडे यांनी शेवटी सांगितले.
कोकणात सहकार वाढला पाहिजे- योगिता मुरडे
खेडच्या सहाय्यक निबंधक योगिता मुरडे यांनी आपल्या मनोगतात चिपळूण नागरी पतसंस्थेच्या उत्तम व्यवस्थापनाचे कौतुक करताना पश्चिम महाराष्ट्रात सहकार वाढतो आहे. कोकणात सहकार क्षीण होतोय तरी कोकणात सहकार वाढला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्रात सहकारात आणखी काय करता येईल? याचा विचार निबंधक कार्यालयात घेऊन येताना लोकं दिसतात. मात्र इकडे उलट परिस्थिती आहे. इथली लोकं तक्रारी घेऊन येताना दिसतात. ती संस्था बंद कशी पडेल? संचालक मंडळ बरखास्त कसे होईल? याचा प्रयत्न होताना दिसतो, असे श्रीमती मुरडे यांनी स्पष्टपणे नमूद केले. सहकार वृद्धीसाठी सहाय्यक निबंधक विभाग सदैव तत्पर असेल अशी, ग्वाही दिली.तसेच यावेळी अविनाश आंब्रे, भाजपा गटनेते शशिकांत मोदी, माजी सभापती रामदास राणे, आबाजी निकम यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या वाटचालीचे कौतुक केले.या सहकार मेळाव्याला वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष तथा भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उपनगराध्यक्ष सौ. रूपाली दांडेकर, भाजपा गटनेते शशिकांत मोदी, नगरसेवक शुभम पिसे संदीप भिसे नगरसेविका सौ. वैशाली निमकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. दीप्ती महाडिक, पंचायत समिती सदस्या सौ. सायली वाजे, माजी नगरसेवक विजय चितळे, माजी सभापती रामदास राणे, भाजपा अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, खेर्डीच्या माजी उपसरपंच सुप्रिया उतेकर, दत्तात्रय पवार, गजानन भोसले, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष आदिती गुडेकर आदी उपस्थित होते. या मेळाव्याचे प्रास्ताविक चिपळूण नागरी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी तर सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.
चिपळूणमध्ये येत्या १० वर्षांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होईल-स्वामिनी यादव
वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष तथा भाजपा रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या सुकन्या स्वामिनी यादव या नुकत्याच एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल स्वामिनीचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी आपल्याला लहानपणापासूनच डॉक्टर बनण्याची इच्छा होती ती इच्छा आपण पप्पा मम्मीला बोलून दाखवली त्यांनी आपल्याला तात्काळ पाठिंबा दर्शवला. मात्र, वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून तुला समाजसेवा करावी लागेल, असे सुचवले. आज आपण एमबीबीएस झाले असून प्रॅक्टिस चिपळूणमध्येच करणार असल्याचे नमूद करताना येत्या दहा वर्षात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूणमध्ये होईल, अशी ग्वाही दिली आणि आपला सन्मान केल्याबद्दल आभार मानताना आजी-आजोबा व पप्पा- मम्मीचे नाव उंचावू, असा शब्द दिला.
फोटो : सहकार मेळाव्यात मार्गदर्शन करताना सुभाषराव चव्हाण यांच्यासह व्यासपीठावर मान्यवर दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




