महसळा ग्रामीण रुग्णालयात दंतचिकित्सकाची नियुक्ती करा
नगरसेविका राखी करंबे यांची नगरपंचायतीची जिल्हा शल्यचिकित्सकांकडे मागणी

महसळा (पवन न्यूज) : राष्ट्रीय ओरल हेल्थ कार्यक्रमांतर्गत महसळा ग्रामीण रुग्णालयात रिक्त असलेले दंतशल्यचिकित्सकाचे पद तातडीने भरावे, अशी मागणी महसळा नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगरसेविका राखी अजय करंबे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड-अलिबाग यांच्याकडे केली आहे.
नगरसेविका राखी अजय करंबे यांनी दिलेल्या पत्रानुसार, ग्रामीण रुग्णालय महसळा हे डोंगराळ भागात असून तालुक्यातील कानाकोपऱ्यातून दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी येथे येतात. मात्र, दंतशल्यचिकित्सकाचे पद रिक्त असल्याने दातांच्या आजारांनी त्रस्त रुग्णांना उपचार मिळत नसून खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडत आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, ग्रामीण रुग्णालयात दंतशल्यचिकित्सकाचे पद मंजूर असून आवश्यक दंतउपचारासाठी डेंटल चेअरही उपलब्ध आहे. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे ही सुविधा वापरात येत नसून रुग्णांची गैरसोय होत आहे.
यामुळे महसळा तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार दंत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय ओरल हेल्थ कार्यक्रमांतर्गत दंतशल्यचिकित्सकाची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका राखी अजय करंबे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.




