खेर्डीत ‘खेळ पैठणी’चा जल्लोष; ३५० महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
आ.भास्कर जाधव अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांची प्रमुख उपस्थिती

चिपळूण (ओंकार रेळेकर)खेळ पैठणी या महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या बहारदार कार्यक्रमाला रविवारी खेर्डीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ३५० महिलांनी सहभाग नोंदवत कार्यक्रम अक्षरशः ‘हाऊसफुल्ल’ केला. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि भास्कर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.
स्पर्धेत महिलांनी खेळ, गाणी, उखाणे आणि विविध कलागुण सादर करत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. अंतिम फेरीत रवीना गिरामे यांनी प्रथम क्रमांक पटकावत आकर्षक इलेक्ट्रिक बाईक जिंकली, तर सीमा ढवळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत फ्रीजवर नाव कोरले. विजेत्यांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांनी महिलांच्या सहभागाचे कौतुक करत, “महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमांची नितांत गरज आहे,” असे मत व्यक्त केले. पहिल्यांदाच चिपळूणात आल्याचे सांगत त्यांनी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि दत्तवाडी मित्र मंडळाचे आधारस्तंभ युवा उद्योजक अजिंक्य पवार यांचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी भास्कर जाधव यांनीही कार्यक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले. “कार्यक्रम अनेकजण आयोजित करतात, मात्र स्वतःच्या पैशातून इतका भव्य उपक्रम उभारणे सोपे नाही. यासाठी अजिंक्य पवार यांचे कौतुक करावे लागेल,” अशा शब्दांत त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
दत्तवाडी मित्र मंडळ यांनी कार्यक्रमासाठी केलेले शिस्तबद्ध नियोजन उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरले. नावनोंदणीपासून बक्षीस वितरणापर्यंत सर्व व्यवस्था सुरळीत पार पडल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. पैठणीच्या झगमगाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात खेर्डीतील रविवार महिलांसाठी अविस्मरणीय ठरला.
फोटो : अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिचा सत्कार करताना आयोजक आणि मान्यवर मंडळी छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




