‘शब्द नव्हे, शस्त्र’ पुस्तकाचा ३० ऑगस्ट रोजी प्रकाशन सोहळा
ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम यांच्या लेखणीतील निवडक अग्रलेखांचे ३०३ पानी पुस्तक; विविध मान्यवरांची उपस्थिती

चिपळूण : कोकणातील ज्येष्ठ पत्रकार तथा ‘कोकण एक्सप्रेस’चे संपादक सतीश कदम लिखित व संपादित ‘शब्द नव्हे, शस्त्र’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चिपळूण येथील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
गेली सुमारे ३५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या सतीश कदम यांनी महाराष्ट्रातील दैनिक सागर, दैनिक सकाळ, दैनिक पुढारी, दैनिक तरुण भारत यांसह हिंदी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांमध्ये न्यूज ब्युरो चीफ आणि आवृत्ती संपादक म्हणून काम केले आहे. गेल्या २५ वर्षांपासून ते स्वतःचे ‘साप्ताहिक कोकण एक्सप्रेस’ प्रकाशित करत असून संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
दैनिक तरुण भारतमध्ये संपादकीय प्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी ‘वाशिष्ठीच्या काठावरून’ हे सदर अनेक वर्षे लिहिले. हे सदर वाचकांच्या पसंतीस उतरले. त्यानंतर ‘साप्ताहिक कोकण एक्सप्रेस’च्या माध्यमातून संपादकीय लेखन करताना त्यांनी राज्यपातळीपासून स्थानिक प्रश्नांपर्यंत विविध विषयांवर परखड अग्रलेख लिहिले.
याच अग्रलेखांपैकी गेल्या दहा वर्षांतील निवडक अग्रलेखांचे संकलन करून ‘शब्द नव्हे, शस्त्र’ हे ३०३ पानी पुस्तक पुणे येथील संस्कृती प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय आणि स्थानिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या लेखनाचा संग्रह म्हणून या पुस्तकाकडे पाहिले जात आहे.
या प्रकाशन सोहळ्याला आमदार शेखर निकम, आमदार प्रमोद जठार, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम, प्रसिद्ध कादंबरीकार व लेखक तानाजीराव चोरगे, प्रसिद्ध साहित्यिक प्रकाश देशपांडे, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, संस्कृती प्रकाशन पुणेच्या प्रकाशक सुनिताराजे पवार, ब्राईट ओरिजिन मीडिया प्रा. लि.चे संचालक शेखर जैन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच दैनिक सागरच्या संपादक शुभदा जोशी या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. शहरातील नगरसेवकांसह साहित्य, पत्रकारिता, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रांतील मान्यवरांचीही कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमात एनडीटीव्ही मराठीच्या निवेदिका व मुक्त लेखिका ऋतुजा कदम उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, पत्रकार, वाचक तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘कोकण एक्सप्रेस’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.




