Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

“शब्दरूपी आयुधाचा समाजासाठी उपयोग करा”.. चिपळूणमध्ये’ शब्द नव्हे शस्त्र ‘पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन..

चिपळूण :

चिपळूण : शब्दांची ताकद जबरदस्त असते. हे शब्द एखाद्या शस्त्रापेक्षा अधिक प्रभावी असतात. त्यामुळे या शब्दरूपी आयुधाचा समाज प्रबोधन आणि परिवर्तनाबरोबरच अन्याय-अत्याचाराविरोधात प्रभावी वापर करावा अशी अपेक्षा चिपळूणमध्ये पत्रकार सतीश कदम यांच्या “शब्द नव्हे शस्त्र” पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांनी शुभेच्छा देताना व्यक्त केली.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष व साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे,प्रसिद्ध सौंदर्यतज्ञ डॉ. यतीन जाधव, डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी पत्रकार सतीश कदम यांना शुभेच्छा दिल्या.

चिपळूणमधील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात काल रविवारी सकाळी भगवान विरेश्वरच्या सान्निध्यात हा सोहळा अत्यंत प्रसन्न वातावरणात पार पडला. पत्रकार कदम यांच्या साप्ताहिकमध्ये प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांचे संकलन “शब्द नव्हे शस्त्र” या पुस्तकाच्या रूपाने करण्यात आले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, दैनिक सागरचे संस्थापक संपादक नानासाहेब जोशी यांच्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे अत्यंत हृदयस्पर्शी, भावस्पर्शी आणि संस्मरणीय ठरला. दीप प्रज्वलित करून आणि मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर व विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. पत्रकार श्री.कदम यांच्या सहधर्मचारिणी नगरसेविका सौ अंजली कदम, कन्या प्रसिद्ध अँकर ऋतुजा कदम आणि कंटेंट रायटर गार्गी कदम यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

त्यानंतर सतीश कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात दैनिक सागरचे संपादक नानासाहेब जोशी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि आपल्या पत्रकारितेच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. पत्रकारांनी केलेली विधायक टीका मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे असे सांगतानाच लोकशाहीत माध्यमांची ताकद मोठी आहे असे स्पष्ट केले. पुस्तक विक्रीतून मिळणाऱ्या निधीतून हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाईल असे त्यांनी घोषित केले.

आमदार शेखर निकम यांनी दिल्या शुभेच्छा..

आमदार निकम यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, सतीश हा अनेक नेत्यांना आपला वाटतो. त्यामुळे तो नेमका कोणाचा आहे याचे कोडे पडते. त्याचे हे मास मॅनेजमेंट कौतुक करण्यासारखे आहे. असे सांगताच सभागृहात हास्याचे फवारे निर्माण झाले.

माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी सतीश कदम यांच्या पत्रकारितेचे कौतुक करून त्यांनी अजून पुस्तक लिहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

साहित्यिक डॉ.तानाजीराव चोरगे..

जिल्हा बँकेचे अध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक डॉ.तानाजीराव चोरगे यांनी आपल्या खुमासदार शैलीत अग्रलेखाचे महत्व स्पष्ट करून पत्रकार कदम यांनी लिहिणे थांबवू नये,त्यांच्या पुस्तकांची संख्या वाढत गेली पाहिजे असा प्रेमळ सल्ला दिला. समाज परिवर्तनासाठी अग्रलेखांची गरज आहे, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी अग्रलेख लिहिलेच पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर नागरिक तसेच लोकप्रतिनिधी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर उद्योजक शेखर जैन हेही शुभेच्छा देण्यासाठी आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार शाहीद खेरटकर यांनी केले.

चौकट…दैनिक सागरचे संस्थापक नानासाहेब जोशी यांच्या आठवणींना उजाळा..

माजी आमदार सदानंद चव्हाण,आमदार शेखर निकम, उत्सवमूर्ती सतीश कदम या सर्वांनी दैनिक सागरचे संस्थापक नानासाहेब जोशी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना रोजच्या जीवनात दैनिक सागर हा अविभाज्य भाग बनला आहे. आजच्या डिजिटल युगातही दैनिक सागरची ओढ कायम असते अशी भावना बोलून दाखविली.त्यामुळे हा कार्यक्रम हृदयस्पर्शी झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!