मोदी सरकारच्या १२ वर्षपूर्तीनिमित्त भाजपकडून ‘तपपूर्ती मास’ साजरा
जनतेच्या समस्या जाणून घेणार; विविध उपक्रमांचे आयोजन : आमदार प्रमोद जठार

चिपळूण (ओंकार रेळेकर)केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारला सत्तेत येऊन १२ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे देशभरात २६ मे ते २१ जून दरम्यान ‘तपपूर्ती मास’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने शहरासह ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवले जाणार असून, मोदी सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवतानाच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सतीश मोरे, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष शशिकांत मोदी,भाजपा नगरसेवक आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
शहरातील मार्कंडी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध योजनांचा आढावा घेतला. देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचल्याचा दावा करताना त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे, अयोध्येतील राम मंदिर उभारणी, डिजिटल क्रांती आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या योजनांचा उल्लेख केला.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुमारे १२ कोटी नागरिकांना अनुदानाचा लाभ मिळाल्याचे सांगताना, देशभरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘तपपूर्ती मास’ दरम्यान भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ग्रामीण व शहरी भागात जाऊन केंद्र सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवतील. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे संकलन करून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करणार असून, विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी, तुमच्या समस्या आमची जबाबदारी’ हा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे जठार यांनी सांगितले. या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यांतील शहर व ग्रामीण भागात भेटी देऊन नागरिकांची कामे मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित केलेल्या अणुऊर्जा प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांच्या भावना जाणून घेऊन मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सतीश मोरे, तालुकाध्यक्ष विनोद भूरण, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेविका अंजली कदम, स्वानंद रानडे, विजय चितळे, आशिष खातू यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : चिपळूण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव,सतीश मोरे आणि कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




