
मुंबई, ता. ३० : चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांची मुंबई येथे भेट घेऊन विविध विकासकामे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित मागण्यांचे निवेदन सादर केले. संघटनेच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिले.
या भेटीदरम्यान चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायतींसमोरील विविध प्रश्न, विकासकामांसाठी आवश्यक निधी, तसेच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा झाली. सरपंच संघटनेने विविध मागण्या मांडत त्या तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, “सरपंच हा गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. आपण गावचे प्रमुख आहोत आणि आपल्या गावाचे रूप पालटण्याचा निर्धार करून काम केले पाहिजे. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. जिथे मार्गदर्शन किंवा मदतीची आवश्यकता भासेल, तिथे मी निश्चितच तुमच्या पाठीशी उभा राहीन.”
या प्रसंगी भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप नेते वैभव खेडेकर, भाजप नेते सहदेव बेटकर, रत्नागिरी दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा चिटणीस तथा चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, जिल्हा कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत जाधव, भाजप चिपळूण ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्षा व भिलेच्या सरपंच सौ. आदिती गुडेकर, संघटनेचे उपाध्यक्ष सुहास भागडे, सचिव विकास गमरे, सहसचिव सदानंद पवार, सदस्य श्रेया वीरकर, नम्रता मोहिते, सल्लागार संदीप जाबरे, सल्लागार व मालघरचे सरपंच सुनील वाजे यांच्यासह चिपळूण तालुक्यातील अनेक सरपंच उपस्थित होते.
या बैठकीमुळे चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायतींचे विविध प्रश्न शासन स्तरावर प्रभावीपणे मांडले गेल्याचे समाधान सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.




