Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

आ.भास्करराव जाधव यांच्याकडून गुहागर मतदारसंघातील ४ रुग्णालयांच्या प्रश्नांचा निपटारा

पावसाळी अधिवेशन संपताच रामपूर,आबलोलीसह गुहागर रुग्णालयाच्या पाहणीसाठी राज्याचे आरोग्य संचालक येणार वावे हॉस्पिटलच्या निधीसाठीही तात्काळ मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव

मुंबईत आरोग्यमंत्र्यांसमवेत बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

चिपळूण (ओंकार रेळेकर) गुहागर विधानसभा मतदारसंघातील खेड तालुक्यातील वावे, चिपळूण तालुक्यातील रामपूर, गुहागर तालुक्यातील आबलोली आणि गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालय या चारही रुग्णालयांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा निपटारा मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी राज्याचे आरोग्यमंत्री ना. श्री. प्रकाश आबिटकर यांच्यासोबत बैठक घेऊन केला. वावे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकाम निधीसाठी तात्काळ मा. मुख्यमंत्री यांना प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन देऊन पावसाळी अधिवेशन संपताच रामपूर, आबलोलीसह गुहागर रुग्णालयांची प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ पुढील कार्यवाही करावी, अशी सूचना या बैठकीत ना. आबिटकर यांनी राज्याच्या आरोग्य संचालकांना केली. त्यामुळे ही चारही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्रेणीवर्धन झालेल्या वावे रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, रामपूर रुग्णालयासाठी उर्वरित जागा मिळेपर्यंत आहे त्या जागेतील इमारतीवर मजला वाढवून ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात यावे, आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या श्रेणीवर्धनास मान्यता देण्यात यावी आणि गुहागर येथील रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करून सुसज्ज रुग्णालय सुरू करावे या मागण्यांसंदर्भात स्वतंत्र बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी आरोग्य मंत्री ना. श्री. आबिटकर यांच्याकडे चालू असलेल्या अधिवेशन काळात केली होती.वावे रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनात आलेले अडथळे आणि अडचणी गेली तीन-चार वर्ष संघर्ष करून आपण दूर केल्या. आता श्रेणीवर्धन झाले आहे. रुग्णालय बांधकामासाठी ३१.४९ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादरही झाला आहे. हा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. श्री. जाधव यांनी केली. त्यावर सदर निधीसाठी आम्ही तात्काळ मा. मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठवून तो मान्य करून घेतो, असे आश्वासन ना. श्री. आबिटकर यांनी दिले आणि हा प्रस्ताव तात्काळ पाठवण्याची सूचना त्यांनी बैठकीतच अधिकाऱ्यांना दिली.
रामपूर आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन झाले असले तरी सध्या आहे ती म्हणजेच ३३ गुंठे जागा पुरेशी नाही. पण त्यासमोरच ४८ गुंठे जागा शासनाच्या मालकीची आहे. ही जागा मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव आवश्यक आहे. परंतु, मागणी करूनही प्रत्यक्षात हा ठराव करत नाहीत, अशी कारणे अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. त्यावर ठराव करून घेऊन जागा शासनाच्या नावावर करून घेण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो असे सांगून आ. श्री. जाधव यांनी ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सध्या आहे त्या इमारतीवर एक मजला वाढवून ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी ना. श्री. आबिटकर यांच्याकडे केली.
आबालोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या श्रेणीवर्धनाचा विषय आला तेव्हा अधिकाऱ्यांनी गुहागर येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी निकषाप्रमाणे आवश्यक असलेली जागा नसल्याने हे ग्रामीण रुग्णालय आबलोली येथे स्थलांतरित करावे, असा पर्याय सुचवला. परंतु आमदार श्री. जाधव यांनी त्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. गुहागर हे तालुक्याचे ठिकाण आहे. शिवाय गुहागर शहर व जवळपास चांगले हॉस्पिटल नाही. त्यामुळे तिथे आहे त्या जागेत बहुमजली इमारत उभी करून सुसज्ज रुग्णालय करावे, अशी मागणी केली. त्याचवेळी आबलोली हे २५ ते ३० गावांचे मध्यवर्ती व बाजारपेठेचे ठिकाण असल्याने खास बाब म्हणून या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनास मान्यता द्यावी, अशी विनंती ना. श्री. आबिटकर यांना केली.
चर्चेअंती ना. श्री. आंबेडकर यांनी आमदार श्री. भास्करराव जाधव हे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांची भाषणे ऐकत, त्यांच्या कामाची पद्धत पाहत मी मोठा झालो आहे आणि आज पहिल्यांदा त्यांनी माझ्याकडे त्यांच्या मतदारसंघातील हे महत्त्वाचे प्रश्न मांडले आहेत. मला ते मार्गी लावावेच लागतील, असे आवर्जून नमूद करत तात्काळ निर्णय करण्यासाठी हे अधिवेशन संपताच तुम्ही स्वतः गुहागर मतदारसंघात जाऊन रामपूर, आबलोली व गुहागर रुग्णालयांची पाहणी करावी, अशी सूचना राज्याचे आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांना केली.बैठकीला राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त श्री. संजय काटकर, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य विभागाच्या सहसंचालक श्रीमती सुनिता गोलाईत, सहसंचालक डॉ. राजेंद्र भालेराव, आरोग्यमंत्री ना. श्री. आबिटकर यांचे खाजगी सचिव श्री. मंगेश शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

फोटो : गुहागर विधानसभा मतदारसंघातील चार प्रमुख रुग्णालयांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री ना. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपस्थित गुहागर- चिपळूण -खेड मतदारसंघाचे आमदार श्री भास्करराव जाधव तसेच राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त श्री. संजय काटकर, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य विभागाच्या सहसंचालक श्रीमती सुनिता गोलाईत, सहसंचालक डॉ. राजेंद्र भालेराव, आरोग्यमंत्री ना. श्री. आबिटकर यांचे खाजगी सचिव श्री. मंगेश शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप आदी दिसत आहे (छाया: ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!