Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

वाशिष्ठी डेअरीतर्फे उद्या ‘कृषी मेळावा’कोकणातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

वाशिष्ठीचे चेअरमन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ.स्वप्ना यादव यांच्या पुढाकाराने संपन्न होणार कृषी मेळावा

चिपळूण (ओंकार रेळेकर) : कोकणातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती, नव्या तंत्रज्ञानाची माहिती आणि कृषी क्षेत्रातील बदलत्या संधींची ओळख करून देण्यासाठी वाशिष्ठी डेअरीतर्फे उद्या गुरुवार दिनांक २ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता चिपळूण येथील सहकार भवन, सहकार सभागृह, बहादूरशेख नाका येथे भव्य ‘कृषी मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला हा मेळावा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहे.


“कोकणी शेतकऱ्यांपासून… कोकणी माणसांपर्यंत!” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना, पशुसंवर्धन, पीक व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींची माहिती देणे हा आहे.
मेळाव्यात कृषीविषयक माहिती आणि तंत्रज्ञान या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसनही करण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील अनुभवी अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरीचे डॉ. सोपान शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी, चिपळूणचे शिवाजी शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, रत्नागिरीचे डॉ. दत्तात्रय सोनावले, तालुका कृषी अधिकारी, शत्रुघ्न म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती, पीक नियोजन, उत्पादन खर्चात बचत, पशुपालन, शाश्वत शेती आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे.
या मेळाव्याला चिपळूण नागरीचे संस्थापक, अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह कृषी व विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
बदलत्या हवामानाचा परिणाम, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील स्पर्धा या पार्श्वभूमीवर पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती आणि नवीन कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देणारा हा मेळावा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. “ज्ञानात केलेली गुंतवणूक हीच शेतीतील सर्वात मोठी गुंतवणूक आहे.” नवीन तंत्रज्ञान स्वीकारून उत्पादन वाढविणे, खर्च कमी करणे आणि शेती अधिक फायदेशीर बनविण्याचा मार्ग या मेळाव्यातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत बबन यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!