गुणवंत विद्यार्थ्यांनी भविष्यात राजकारणातही यावे महाराष्ट्राला स्वच्छ व पारदर्शक नेतृत्वाची गरज : शिवसेना सचिव विनायक राऊत
कोकणातील शिक्षणाचा दर्जा राज्यासाठी आदर्श; भ्रष्टाचारमुक्त परीक्षा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच कोकणचे वैशिष्ट्य

.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच युवासेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उबाठा शिवसेना पक्ष व युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’शनिवारी देवरुख येथील मराठा भवनमध्ये उत्साहात संपन्न झाला.यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत मार्गदर्शन करताना बोलत होते
“पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करायला हवे. महाराष्ट्रातील अनेक शाळा पाहिल्यानंतरही शिक्षण क्षेत्रात आदर्शवत कार्य करणाऱ्या संस्था, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणारे पालक,समर्पित शिक्षक आणि त्यांच्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद देणारे विद्यार्थी जर कुठे असतील तर ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहेत असे राऊत म्हणाले.
“नीट परीक्षेसारख्या प्रकरणांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात आहे. मात्र सुदैवाने अशा गैरप्रकारांमध्ये कोकणातील विद्यार्थ्यांचा सहभाग नसल्याचे दिसते. भ्रष्टाचारमुक्त परीक्षा, कॉपीमुक्त वातावरण आणि दर्जेदार शिक्षण ही कोकणची ओळख आहे,” असे ते म्हणाले.
कोकणातील विद्यार्थ्यांचे यश मुंबईकरांसाठीही प्रेरणादायी आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के निकालांचे कौतुक करताना राऊत म्हणाले, “मुंबईतील अनेक शैक्षणिक संस्था चालवत असतानाही आम्हाला हे गणित अजून उलगडलेले नाही. त्यामुळे जुलै-ऑगस्टमध्ये मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी कोकणातील गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष मार्गदर्शन आयोजित करण्याचा आमचा मानस आहे.”विद्यार्थ्यांनी राजकारणातही यावे
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी राजकारणातील स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला. “आजचे राजकारण गढूळ झाले आहे. भ्रष्टाचारमुक्त,लोकहितवादी आणि पारदर्शक राजकारण उभे करण्यासाठी सुशिक्षित व सामाजिक भान असलेल्या तरुणांनी पुढे येणे आवश्यक आहे. भविष्यात आपल्या क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी राजकारणातही योगदान द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचा उल्लेख आपल्या खासदारकीच्या कार्यकाळाचा उल्लेख करताना राऊत यांनी सिंधुदुर्गमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अत्याधुनिक रुग्णालयाचा संदर्भ दिला. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्गमध्ये हजार कोटी रुपयांच्या तरतुदीसह ५०० खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय आणि महाराष्ट्रातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहिले. नुकत्याच जाहीर झालेल्या एमबीबीएस निकालात ९५ पैकी ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून याचा लाभ कोकणातील आरोग्य व्यवस्थेला होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
जिल्हा बँक निवडणूक लढविण्याची घोषणा :
भाषणाच्या शेवटी राऊत यांनी आगामी राजकीय वाटचालीबाबतही भूमिका स्पष्ट केली. “शिवसेनेतून बेइमानी करणारे अनेक जण निघून गेले असून आता गद्दारमुक्त शिवसेना उभी राहत आहे. येणारी रत्नागिरी जिल्हा बँकेची निवडणूक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पूर्ण ताकदीने लढविणार असून जिल्हा बँकेत संपूर्ण पॅनल उभे केले जाईल,” अशी घोषणा त्यांनी केली.
रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणारे तसेच बारावीच्या कला,वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील तालुकास्तरीय प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र,स्कूल बॅग व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
शिवसेना संपर्कप्रमुख सुरेश कदम, जिल्हाप्रमुख दत्ता कदम आणि
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत कठोर परिश्रम,जिद्द आणि शिस्त यांच्या बळावर मोठे यश संपादन करण्याचे आवाहन केले.शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करतांना पालक आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता. या सोहळ्याला
,शिवसेना सचिव माजी खा.विनायक राऊत,माजी मंत्री रवींद्र माने,ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता कदम,रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश कदम,जि.प सदस्य संतोष थेराडे,चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम,जि.प सदस्य नेहा माने,राजापूर तालुका प्रमुख कमलाकर कदम,प्रद्नुंम माने,बंड्या बोरुकर,प्रवीण शेट्ये,जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वेदाताई फडके,माजी जि.प सदस्य दिनेश जैतापकर,चिपळूण तालुका प्रमुख बळीराम गुजर,शहर प्रमुख भय्या कदम,नगरसेवक केतन शेट्ये,नगरसेवक बाळा कामेरकर, नगरसेविका ऋतिक कदम,नगरसेविका मेधा कापडी,माजी उपनगराध्यक्ष विनय गुरव,राजापूर नगरसेवक सुबोध पवार,मेघा कदम,प्रमोद शेरे,संपर्क प्रमुख रामचंद्रसरवणकर,चंद्रप्रकाश नकाशे,लांजा विधानसभा क्षेत्रप्रमुख अशोक सक्रे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी,
शिवसैनिक,विद्यार्थी,पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,सुशांत जाधव,नीलेश कुंभार यांनी केले.
फोटो : बारावी परीक्षेत आर्ट्स मधून कोकणातून प्रथम आलेली लाघवी शेखर सावले हिचा सन्मान करताना विनायक राऊत यांच्यासह सुरेश कदम,दत्ता कदम, रवींद्र माने,रवींद्र डोळस यांच्यासह मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




