ज्ञानदीप स्कूलमध्ये रानभाजी महोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांनी उभारले रानभाज्यांचे आकर्षक स्टॉल!
खेड :

खेड (ओंकार रेळेकर) : मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) मध्ये विद्यार्थ्यांसाठी रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड-रत्नागिरी संचालित या शाळेत १० ऑगस्ट रोजी इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक रानभाज्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या पोषणमूल्य व औषधी गुणधर्मांची माहिती देणे, तसेच स्थानिक जैवविविधतेचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या शाळेत आणून त्यांचे आकर्षक प्रदर्शन आणि विक्रीचे स्टॉल उभारले. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रानभाज्यांची खरेदी केली.यावेळी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी उपयोग आणि पर्यावरण संवर्धनातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, स्थानिक अन्नसंस्कृतीबद्दल आदर आणि पर्यावरण संवर्धनाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.कार्यक्रमाला गीता समूह, खेडचे अध्यक्ष मा. श्री. मयुरेश पेठे तसेच प्रशालेचे प्राचार्य मा. श्री. भरत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन केले.या रानभाजी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.




