चिपळूणमध्ये १८ व १९ ऑक्टोबरला दुर्गामाता दौडीचा जयघोष!
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे महाअष्टमी आणि महानवमीला आयोजन

हिंदू बांधव-भगिनींना सहभागी होण्याचे आवाहन
चिपळूण (ओंकार रेळेकर) धर्म, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा जागर करत स्त्रीशक्तीचे दर्शन घडविणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, चिपळूण यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीचे आयोजन रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी महाअष्टमी आणि सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी महानवमीला करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी आदिशक्ती दुर्गामातेचा जयघोष करीत चिपळूण शहरातून दुर्गामाता दौड काढण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सवातील घटस्थापनेपासून खंडेनवमीपर्यंत आयोजित होणारी दुर्गामाता दौड हा केवळ धार्मिक उपक्रम नसून, प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या शक्तीची जाणीव करून देणारा आणि हिंदू धर्म, परंपरा व संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम आहे. ‘तूच दुर्गा, तूच भवानी, तूच चंडी, तूच काली’ या प्रेरणादायी संदेशातून स्त्रीशक्तीचा जागर करण्यात येतो.




