तिकीट खिडकी बंद का केली?”शौकत मुकादमांचा सवाल; गणेशोत्सवापूर्वी खिडकी सुरू,डिजिटल तिकीट सुविधाही
चिपळूण :

तिकीट खिडकी बंद का केली?”शौकत मुकादमांचा सवाल; गणेशोत्सवापूर्वी खिडकी सुरू,डिजिटल तिकीट सुविधाही
चिपळूण (ओंकार रेळेकर)कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी १८ ऑगस्ट रोजी चिपळूण रेल्वे स्थानकाला अचानक भेट देऊन शहराच्या बाजूकडील बंद असलेल्या तिकीट खिडकीबाबत रेल्वे प्रशासनाकडे जाब विचारला.“पूर्वी सुरू असलेली तिकीट खिडकी बंद का केली? ती पुन्हा सुरू करा,” अशी मागणी शौकत मुकादम यांनी केली. ही तिकीट खिडकी बंद असल्याने चिपळूण शहर तसेच गुहागर बाजूकडील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी चिपळूणला येणार आहेत.त्यामुळे “गणेशोत्सवासाठी मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाने काय व्यवस्था केली आहे?”असा सवालही मुकादम यांनी उपस्थित केला. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बंद तिकीट खिडकी गणेशोत्सवापूर्वी सुरू करावी,अशी मागणी त्यांनी केली.यावर रेल्वेचे कमर्शियल सुपरवायझर अधिकारी श्री. खांबे यांनी गणेशोत्सवापूर्वी सदर तिकीट खिडकी सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात येईल,असे आश्वासन दिले.दरम्यान, २८ ऑगस्टपासून प्लॅटफॉर्मवर एमयूटीएस (MUTS) सुविधेद्वारे मोबाईलवरून अनारक्षित रेल्वे तिकीट काढता येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.या सुविधेमुळे प्रवाशांना तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहण्याची गरज कमी होऊन वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे.यावेळी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम, वालोप गावचे माजी सरपंच रविंद्र तांबितकर तसेच रेल्वे अधिकारी उपस्थित होते.




