Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

संघर्ष, कष्ट आणि कोकणाची माती याच आधारावर घडला माझा प्रवास : प्रभाकर मोरे

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूणच्या मुलाखतीतून उलगडले रियल लाइफ

चिपळूण (ओंकार रेळेकर)कोकणातील एका छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास, आयुष्यातील कठीण प्रसंगांना दिलेला धैर्याने सामना आणि कुटुंबाच्या पाठबळावर उभा राहिलेला अभिनय प्रवास, या सगळ्यांच्या बळावर आज ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळख निर्माण झाली, अशी भावना अभिनेते प्रभाकर मोरे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात प्रभाकर मोरे यांच्या खास मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार तथा कलाकार योगेश बांडागळे यांनी ही मुलाखत घेतली. या संवादातून मोरे यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवास, अभिनय क्षेत्रातील वाटचाल, यश-अपयशाचे अनुभव तसेच वैयक्तिक आयुष्यातील अनेक भावनिक क्षण प्रेक्षकांसमोर उलगडले.कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने श्रीफळ वाढवून करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, रमण डांगे, राजाभाऊ पाटणकर, समीर जानवलककर, प्रभंजन पिंपुटकर, नित्यानंद भागवत, श्री. पोटे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला चिपळूण व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.वहाळ (ता. चिपळूण) या छोट्याशा गावात जन्म झाल्याचे सांगताना मोरे म्हणाले की, त्यांच्या अभिनयाची बीजे शाळेतील गॅदरिंग आणि गावातील सांस्कृतिक कार्यक्रमांतच रुजली. लहानपणापासूनच रंगमंचाची आवड निर्माण झाली होती. त्यांच्या वडिलांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. माझे वडील मला ‘बबन’ म्हणून हाक मारायचे आणि मी मोठा होईन, असे नेहमी म्हणायचे; मात्र आज माझे यश पाहण्यासाठी ते आपल्यात नाहीत, असे सांगताना ते भावूक झाले.कोकणातील पारंपरिक लोककला ‘नमन–दशावतार’ आणि स्थानिक बोलीभाषेतील वैशिष्ट्यपूर्ण शैली यांचा त्यांच्या अभिनयावर मोठा प्रभाव पडला. ‘शालू झोका देखो मैना’ या लोकगीतामुळे त्यांना सुरुवातीची ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली.मुलुंड येथे नोकरी करत असताना ‘वस्त्रहरण’ या गाजलेल्या नाटकातून त्यांना मोठी संधी मिळाली. ज्येष्ठ कलावंत मच्छिंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध भूमिका साकारत आपला अभिनय अधिक परिपक्व केला. एका प्रसंगी भूमिका मिळवण्यासाठी टॉस करण्याचा प्रस्ताव आला असताना, माझ्या अभिनयावर संधी द्या, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या आत्मविश्वासामुळे त्यांना कायमस्वरूपी महत्त्वाची भूमिका मिळाली, हा त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला.यानंतर त्यांनी अनेक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आणि दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल टाकले. ‘ठाकरे’ आणि ‘पांगरून’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. मात्र ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे त्यांना घराघरांत ओळख मिळाली. या कार्यक्रमाने त्यांच्या विनोदी अभिनयाला नवी उंची दिली. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी माझ्यातील कलाकार आणि कोकणी माणूस प्रेक्षकांसमोर आणला, असे ते म्हणाले.संघर्षाच्या काळातील अनुभव सांगताना त्यांनी पत्नी विद्या यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. रॉकेलसाठी तासन्‌तास रांगेत उभे राहणे, लहानसहान कामे करून संसार चालवणे—या सगळ्यात माझ्या पत्नीने मोठा वाटा उचलला. तिच्या पाठबळामुळेच मी नोकरी सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेऊ शकलो, असे त्यांनी सांगितले.

मुलाखतीदरम्यान घेतलेल्या रॅपिड फायर सत्रात अभिनेता नसतो तर शेतकरी झालो असतो, असे सांगत त्यांनी आपल्या मातीतल्या नात्याची जाणीव व्यक्त केली. तसेच “प्रत्येकाने स्वतःच्या आवडी-निवडी ओळखून त्यानुसार मार्ग निवडावा,” असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला.

या कार्यक्रमाद्वारे चिपळूणकरांना आपल्या मातीतल्या कलाकाराचा प्रवास जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाला लाभलेली उत्स्फूर्त उपस्थिती हीच मोरे यांच्या लोकप्रियतेची साक्ष ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!