सीआयएससीइच्या विभागीय स्केटिंग स्पर्धेत रेयांश बनेची दमदार कामगिरी
दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले रोड लॅप आणि ५०० मीटर क्वाड्स प्रकारात प्रथम क्रमांक

दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले रोड लॅप आणि ५०० मीटर क्वाड्स प्रकारात प्रथम क्रमांक
आतापर्यंत ५१ सुवर्णांसह ७४ पदकांची विक्रमी कमाई
देवरुख (ओंकार रेळेकर)
सीआयएससीइच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्केटिंग स्पर्धेत ठाणे येथील युरो स्कूलचा विद्यार्थी कु. रेयांश पृथा पराग बने याने उल्लेखनीय कामगिरी करत दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
नाशिक येथील सिल्वर ओक युनिव्हर्सल स्कूल येथे १९ सप्टेंबर २०२६ रोजी ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत रेयांशने अंडर-११ (U-11) वयोगटात सहभाग घेतला. त्याने रोड लॅप तसेच ५०० मीटर क्वाड्स या दोन्ही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि दोन सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले.
महाराष्ट्राचे सहा वेळा प्रतिनिधित्व
रेयांशने आपल्या अल्पवयातच रोलर स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गोवा, म्हैसूर, केरळ, कोलकाता, विशाखापट्टणम आणि झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये त्याने सहा वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
आजवरच्या विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये रेयांशने तब्बल ५१ सुवर्ण, १५ रौप्य आणि ८ कांस्य अशी एकूण ७४ पदके आपल्या नावावर केली आहेत. इतक्या कमी वयात ७४ पदकांची उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रेयांशच्या या यशाची क्रीडा क्षेत्रात विशेष दखल घेतली जात आहे.
कुटुंबीयांकडून सातत्याने प्रोत्साहन
रेयांश हा शिवसेना भांडूपचे युवानेते पराग बने आणि पराग इंग्लिश स्कूल, भांडूपच्या मुख्याध्यापिका पृथा पराग बने यांचा चिरंजीव आहे. स्केटिंगमधील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमागे कुटुंबीयांचे प्रोत्साहन, मेहनत आणि सरावाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे.
रेयांशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक तसेच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यासाठी रेयांशला शुभेच्छा दिल्या जात आहेत.




