काँग्रेसकडून रत्नागिरी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर
सोनललक्ष्मी घाग यांच्यावर दुसऱ्यांदा जबाबदारी, तर दक्षिणची धुरा जमीर खलिफेंकडे


सोनललक्ष्मी घाग यांनी आजवर केलेल्या उल्लेखनीय कार्याची आणि स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला मिळवून दिलेल्या यशाची पोचपावती म्हणून पक्षनेतृत्वाने त्यांच्यावर सलग दुसऱ्यांदा या पदाची जबाबदारी विश्वासाने सोपवली आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय शिबीर दिनांक २७ व २८ फेब्रुवारी तर दिनांक १ मार्च रोजी चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे शिबिर पार पडले होते. या शिबिराच्या यशस्वी नियोजनाबद्दल काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी सोनललक्ष्मी घाग यांचे कौतुक केले होते. तसेच काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी एक वर्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने रत्नागिरी उत्तर तालुक्याचा दौरा करतांना काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षीय कामकाजासंदर्भात मार्गदर्शन करतांना काँग्रेस घरोघरी पोहोचविण्याचे आवाहन केले होते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवार उभे करून काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी अविरत मेहनत घेतली. विशेष म्हणजे चिपळूण नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आणलेच शिवाय नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देऊन काँग्रेस निवडणूक रिंगणात असल्याचा इरादा स्पष्ट केला होता.
तर रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष जमीर खलिफे यांनी राजापूर नगर परिषद निवडणुकीत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तसेच काँग्रेसप्रती निष्ठा असून काँग्रेस पक्षवाढीसाठी ते सातत्याने झटत असतात.राजापूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. याची दखल घेऊन काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी जमीर खलिफेंकडे रत्नागिरी दक्षिणची धुरा सोपवली आहे.
या नियुक्त्या करण्यापूर्वी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नेमलेल्या निरीक्षकांनी प्रत्येक जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेतला. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि अन्य घटकांशी चर्चा करून आपले सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर केले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर निरीक्षकांसोबत आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या सविस्तर चर्चेनंतरच या अंतिम नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
सोनललक्ष्मी घाग आणि जमीर खलिफे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पक्षाने युवा नेतृत्वाकडे नव्याने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

