Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

तख्ताचा वाडा’ उभारा; शाहू महाराजांचे भव्य स्मारक साकार करा!

येसूबाई फाउंडेशनची आक्रमक भूमिका; संस्थापक सुहास राजेशिर्के यांची नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याशी सविस्तर चर्चा

गुरुवार बागेतील ऐतिहासिक वारसा जतनासाठी तातडीने निर्णय घ्या, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

सातारा (पवन न्यूज)साताऱ्याच्या ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या गुरुवार पेठेतील छत्रपती शाहू उद्यानामध्ये ऐतिहासिक स्वरूपातील ‘तक्ताचा वाडा’ पुनर्बांधणी करून तेथे श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या राज्यकारभाराचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी जोरदार मागणी येसूबाई फाउंडेशनने केली आहे. या मागणीसाठी फाउंडेशनचे संस्थापक व माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या स्मारकामुळे शाहू महाराजांच्या कार्याची स्मृती जपली जाईल आणि साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी ओळख मिळेल, असे त्यांनी सांगितले.

माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के यांनी सोमवारी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन हे निवेदन सादर केले .त्यावेळी उपनगराध्यक्ष एडवोकेट दत्ता बनकर,सातारा पालिकेचे मुख्य अधिकारी विनोद जळक जिज्ञासा मंचचे निलेश पंडितशिक्षक परिषदेचे कार्यवाह सुधीर विसापूरे,विश्वतेज मोहिते सचिन राजेशिर्के श्रेयश शेटे,संजय जाधव व पप्पू राजेशिर्केइत्यादी यावेळी उपस्थित होते .जिज्ञासा मंच चे निलेश पंडित यांनी तख्ताच्या वाड्या संदर्भातील येसूबाई फाउंडेशनची बाजू नगराध्यक्ष समोर मांडली यावेळी नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की सातारा ही मराठेशाहीची ऐतिहासिक राजधानी असून छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असल्याचे नमूद केले आहे. गुरुवार पेठेतील छत्रपती शाहू उद्यान हे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असून येथे प्राचीन तलाव, भुयार तसेच शाहू महाराजांनी राज्यकारभार केला त्या तक्ताच्या वाड्याशी संबंधित चौकी आजही अस्तित्वात असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
इतिहासातील विविध संदर्भांनुसार शाहू महाराजांनी याच ठिकाणी बसून अनेक राजकीय निर्णय, पत्रव्यवहार आणि ताम्रपट जारी केल्याचे उल्लेख आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी त्याच स्वरूपातील ‘तक्ताचा वाडा’ उभारण्यात यावा व त्यामध्ये राज्यकारभार करत असलेल्या शाहू महाराजांचा भव्य पुतळा उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले (लोकनियुक्त नगराध्यक्ष) आणि श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले (माजी सहकार मंत्री) यांनाही या ऐतिहासिक वास्तूमध्ये सन्मानपूर्वक स्थान देण्याची मागणी फाउंडेशनने केली आहे.

या प्रकल्पामुळे साताऱ्याच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन होईल, पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिक रोजगार आणि व्यवसाय वाढतील तसेच नव्या पिढीला मराठेशाहीच्या इतिहासाची प्रेरणादायी ओळख होईल, असा विश्वास फाउंडेशनने व्यक्त केला आहे.
राजेशिर्के यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सातारा ही केवळ जिल्ह्याची मुख्यालयाची नगरी नसून मराठेशाहीच्या इतिहासाची राजधानी आहे. त्यामुळे छत्रपती शाहू उद्यानाचा पुनर्विकास हा केवळ सौंदर्यीकरणाचा विषय नसून साताऱ्याच्या ऐतिहासिक अस्मितेचे जतन करण्याचा विषय आहे. नगरपरिषद प्रशासनाने या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा.”या चर्चेनंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी या प्रकल्पावर सर्व समावेशक चर्चा करून तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!