Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद स्कॉन प्रोजेक्ट्सला तीन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार

चिपळूण (ओंकार रेळेकर) : सामाजिक कार्य आणि औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत स्कॉन प्रो फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शंकरराव चव्हाण यांनी दुहेरी यश संपादन केले आहे. एका बाजूला सामाजिक बांधिलकी जपत अवघ्या ८ तासांत ८९२ गरजूंना कृत्रिम अवयव बसविण्याचा विक्रम घडवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळविले, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या नेतृत्वाखालील देशभरात कार्यरत स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा. लि. या औद्योगिक बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीला तीन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
स्कॉन प्रो फाउंडेशन, भारत विकास परिषद आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अवघ्या आठ तासांत ८९२ गरजूंना कृत्रिम अवयव बसविण्याचा विक्रम घडविण्यात आला. या उल्लेखनीय उपक्रमाची दखल घेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या कार्याची नोंद केली असून नुकतेच या तिन्ही संस्थांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. त्यामुळे स्कॉन प्रो फाउंडेशनसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. गरजू आणि अपंगत्वामुळे परावलंबी जीवन जगणाऱ्या व्यक्तींना स्वाभिमानाने उभे करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कृत्रिम अवयव तयार करण्याचे काम भारत विकास परिषद, पुणे यांनी केले. लाभार्थ्यांच्या शरीररचनेनुसार अचूक माप घेऊन वापरण्यास सोयीस्कर असे कृत्रिम अवयव तयार करून ते पूर्णपणे मोफत बसविण्यात आले. या उपक्रमासाठी आवश्यक असलेली प्रशस्त जागा व सुविधा ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी उपलब्ध करून दिल्या. तर लाभार्थ्यांना त्यांच्या गावांमधून पुण्यापर्यंत आणणे, त्यांच्या सोबत आलेल्या नातेवाईकांची निवास व भोजन व्यवस्था करणे तसेच उपचारानंतर पुन्हा त्यांच्या गावी सुरक्षित पोहोचविण्याची संपूर्ण जबाबदारी निलेश चव्हाण यांच्या स्कॉन प्रो फाउंडेशनने पार पाडली. निलेश शंकरराव चव्हाण हे चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे गावचे सुपुत्र असून त्यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली हा सामाजिक उपक्रम साकार झाला. यापूर्वीही त्यांच्या पुढाकारातून चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील गरजूंसाठी कृत्रिम अवयव वितरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक अवयवांचे माप घेण्यात आले आणि १७८ लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव बसवून त्यांना परावलंबी जीवनातून मुक्त करून स्वाभिमानाने जगण्याची संधी देण्यात आली. दरम्यान, औद्योगिक बांधकाम क्षेत्रातही देशभरात कार्यरत स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा. लि. ने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. औद्योगिक इमारती, उत्पादन प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क आणि मोठ्या औद्योगिक संकुलांच्या बांधकामामध्ये स्कॉन प्रोजेक्ट्सने देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुणवत्ता, सुरक्षितता, वेळेचे काटेकोर पालन आणि ग्राहकांचा विश्वास या तत्त्वांवर आधारित काम करण्यासाठी कंपनी ओळखली जाते. अनेक नामांकित राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी स्कॉनने औद्योगिक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले असून औद्योगिक बांधकाम क्षेत्रात कंपनीचे नाव विश्वासार्ह म्हणून घेतले जाते. याच उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया – पुणे सेंटर आयोजित WBSC Awards 2025 मध्ये कंपनीला हिंदुस्थान कोका कोला बेव्हरेजेस लि., लोटे (चिपळूण) आणि रिव्हाल्यू रिसायकल प्रा. लि., नाशिक या प्रकल्पांसाठी दोन मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच IFACE – अल्ट्राटेक अवॉर्ड्स 2025 मध्ये शिरोडकर प्रिसी प्रा.लि., नाशिक या प्रकल्पासाठी एक प्रतिष्ठित पुरस्कार कंपनीला मिळाला आहे. या पुरस्कारांमुळे स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा. लि. च्या औद्योगिक बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. सामाजिक कार्य आणि औद्योगिक क्षेत्रातील या दुहेरी यशामुळे निलेश चव्हाण, स्कॉन प्रो फाउंडेशन आणि स्कॉन समूहावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!