राजापुरात प्रथमच राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नगरसेवक सुबोध पवार यांच्या संकल्पनेतून आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचे आयोजन

नगरसेवक सुबोध पवार यांच्या संकल्पनेतून आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचे आयोजन
राजापूर (पवन न्यूज) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक सुबोध पवार यांच्या संकल्पनेतून राजापूर शहरातील जवाहरचौक येथील पिकअप शेडवरील सभागृहात प्रथमच राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम तसेच माजी आमदार तथा नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस व तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
लहान मुलांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या संस्कृती, परंपरा व भक्तीभावाची ओळख निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध वेशभूषांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी माजी सभापती अभिजित तेली, माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष हातणकर, नगरसेवक जाधव, उर्मिला बाकाळकर, अफरोज काजी, विभाग संघटक मीनाक्षी गुरव, संगीता चव्हाण, युवासेनेचे सुभाष नवाळे, प्रतीक्षा मांजरेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, मान्यवर, नागरिक व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे राजापूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आयोजकांच्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.




