वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाकडून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य
प्रकल्प यशस्वी केल्याबद्दल प्रशांत यादव यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

सांस्कृतिक कार्य मंत्री ना. आशिष शेलार यांनी दिली वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट
चिपळूण (ओंकार रेळेकर)शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य मानून प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या आधारावर वाशिष्ठी डेअरी यशस्वी प्रकल्प उभारला आहे, अशा शब्दात राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ना एडवोकेट ना. आशिष शेलार यांनी कौतुक करताना यादव दाम्पत्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने भविष्यात शेतकऱ्यांचे हित असंच जपावे, असे आवाहन ना. शेलार यांनी यावेळी केले.
राज्याची माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री ना. एडवोकेट आशिष शेलार बुधवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मुंबईवरून वंदे भारत एक्सप्रेसने खेड येथे आगमन झाल्यानंतर भाजपाच्या वतीने ना. शेलार यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यानंतर खेड व लोटे येथे काही गाठीभेटी घेतल्यानंतर ते चिपळूणच्या दिशेने रवाना झाले.
यावेळी चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरी प्रकल्पस्थळी आगमन होताच या प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी आशिष शेलार यांचे स्वागत करताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तर चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण यांनी ना. शेलार यांचे औक्षण केले. यानंतर ना. आशिष शेलार यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची पाहणी केली.
यावेळी या प्रकल्पाचे अध्यक्ष तथा भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी वाशिष्ठी परिवारातर्फे ना. शेलार यांचा यथोचित सन्मान केला. यानंतर प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांनी प्रकल्पाविषयी ना. शेलार यांना माहिती दिली. यावर ना. ऍड. आशिष शेलार यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातील दुग्धोत्पादनाच्या दर्जाबाबत कौतुक करीत कोकणात डेअरी प्रकल्प यशस्वी केल्याबद्दल यादव दांपत्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
यावेळी चिपळूण तालुका वकील संघाने आपले निवेदन दिले. यावेळी ना. शेलार यांनी पदाधिकारी व सदस्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.

यावेळी आमदार प्रमोद जठार भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष एडवोकेट दीपक पटवर्धन, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालिका एडवोकेट नयना पवार, वाशिष्ठी डेअरीचे संचालक महेश खेतले, प्रशांत वाजे, अविनाश गुढेकर, वाशिष्ठी डेअरीचे जनरल मॅनेजर लक्ष्मण खरात यांच्यासह वाशिष्ठी डेअरीचे इतर अधिकारी कर्मचारी तसेच वकील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते लोकप्रतिनिधी उपस्थित होते.




