महाराष्ट्र
मुंबईत कोकणातील लोककलावंतांसाठी ‘लोककलावंत भवन’ उभारावे
प्रशांत यादव यांची मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी

चिपळूण (ओंकार रेळेकर)
कोकणातील नमन, जाखडी तसेच इतर पारंपरिक लोककलावंतांसाठी मुंबई येथे सर्व सुविधांनी सुसज्ज असे ‘लोककलावंत भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत बाबन यादव यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नमन व जाखडी या लोककला केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून त्या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा आणि कोकणाच्या अस्मितेचा जिवंत वारसा आहेत. या लोककलांच्या माध्यमातून हजारो कलाकार अनेक दशकांपासून संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचे कार्य करत आहेत.
राज्य सरकारने नमन व जाखडी कलाकारांना वार्षिक ₹५० हजार मानधन देण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून, त्याबद्दल कलाकार समाज शासनाचा ऋणी असल्याचेही यादव यांनी नमूद केले आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच कोकणातील अनेक लोककलावंत विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वर्षभर मुंबईत येत असतात. मात्र, त्यांच्या निवास, भोजन व साहित्य ठेवण्याची योग्य व्यवस्था नसल्याने कलाकारांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत मुक्काम करावा लागत असल्याने त्यांच्या सन्मानालाही धक्का पोहोचत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई येथे ५० ते १०० कलाकारांची निवास व्यवस्था, परवडणारे भोजन, सुसज्ज सभागृह (रिहर्सल हॉल), वाद्ये व वेशभूषा ठेवण्यासाठी सुरक्षित कक्ष, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी तसेच ऑनलाइन आरक्षणाची सुविधा असलेले ‘लोककलावंत भवन’ उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
अशा भवनामुळे कोकणातील लोककलावंतांना मोठा आधार मिळेल, तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीकडे प्रभावीपणे हस्तांतरण करण्यास चालना मिळेल, असा विश्वास प्रशांत यादव यांनी व्यक्त केला आहे. तसेच या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना केली आहे.
फोटो : मुंबईत कोकणातील कलाकारांना ‘लोककलावंत भवन’ उभारावे अशी मंत्री.आशिष शेलार यांच्याकडे मागणी करताना प्रशांत यादव छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




