चिपळूणच्या अर्धवट उड्डाणपुलासाठी हालचाली आमदार निलेश राणे यांची सकारात्मक भूमिका
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या पुढाकाराने मुंबईत बैठकखासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अर्धवट उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. चिपळूण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांच्या पुढाकाराने मुंबई येथे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन उड्डाणपूल तातडीने पूर्णत्वास नेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते बापूशेठ काणे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, आरोग्य सभापती शुभम पिसे, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक परिमल भोसले तसेच युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते सर्वेश सुर्वे उपस्थित होते.
बैठकीत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी अपूर्ण उड्डाणपुलामुळे शहरात निर्माण झालेली वाहतूक कोंडी, विशेषतः पाग पॉवर हाऊस परिसरातील वाढते अपघात, तसेच नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना दररोज करावा लागणारा धोकादायक प्रवास याकडे आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. चिपळूणच्या सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी उड्डाणपूल पाग रेस्ट हाऊसपर्यंत पूर्णत्वास नेणे अत्यावश्यक असल्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या मागणीची गांभीर्याने दखल घेत आमदार निलेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकल्पाची माहिती घेतली. तसेच खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची लवकरच भेट घेऊन हा रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
चिपळूणमधील हा उड्डाणपूल अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दररोज हजारो वाहनचालकांना वाहतूक कोंडी व अपघातांच्या धोक्याचा सामना करावा लागत असून, सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आमदार निलेश राणे यांनी दाखविलेली तत्परता यामुळे चिपळूणच्या या बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाच्या कामाला आता गती मिळेल, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प लवकर पूर्ण होऊन चिपळूणकरांना सुरक्षित व सुलभ वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.




