‘प्रति गाणगापूर’ श्रीक्षेत्र तानसात बुधवारी गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्तिभावात होणार साजरा
हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम

मठाधिपती अध्यक्ष प.पू.सद्गुरू अलोकनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे सुरू आहे उत्कृष्ट नियोजन
शहापूर (ओंकार रेळेकर) गुरु-शिष्य परंपरेचा पवित्र वारसा जपणारा आणि श्रद्धा, सेवा तसेच अध्यात्माचा दिव्य संगम घडविणारा गुरुपौर्णिमा महोत्सव बुधवार दि.२९ जुलै रोजी ‘प्रति गाणगापूर’ श्रीक्षेत्र तानसा येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.प.पू.सद्गुरू रमणनाथजी महाराज संजीवन समाधी ट्रस्ट यांच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून मठाधिपती अध्यक्ष प.पू.सद्गुरू अलोकनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सुरू आहे.
,राज्यभरातून हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत.
भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व असून, गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सर्वोच्च दिवस मानला जातो. सद्गुरूंच्या कृपेने श्रद्धा,सेवा, भक्ती आणि अध्यात्माचा मार्ग अधिक दृढ होत असल्याची भावना भाविकांमध्ये आहे.‘गुरुसेवा हीच ईश्वरसेवा’ हा संदेश समाजात रुजविणाऱ्या प.पू.सद्गुरू रमणानंदगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून श्रीक्षेत्र तानसा हे अध्यात्म, साधना आणि भक्तीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून कोकणात प्रसिद्ध आहे.गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त बुधवारी पहाटे ४.३० वाजता ब्रह्ममुहूर्तावर गणपूजनाने कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर स्थानदेवता अभिषेक, दिव्य मूर्ती आरास, सहस्र तुलसीपत्र अर्चन, नैवेद्य, महाआरती,भजन सेवा, महाप्रसाद, गुरुपूजन,पारंपरिक पालखी सोहळा,वैदिक हवन तसेच रात्री शिष्यगणांसाठी विशेष मार्गदर्शन असे विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम दिवसभर आयोजित करण्यात आले आहेत.
गुरुपौर्णिमा हा केवळ धार्मिक उत्सव नसून गुरु-शिष्य परंपरेतील श्रद्धा, संस्कार आणि समर्पणाचा प्रेरणादायी सोहळा आहे. या दिवशी सद्गुरूंच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आणि अध्यात्मिक उन्नतीचा लाभ मिळविण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक श्रीक्षेत्र तानसा येथे दाखल होत असतात.
यावर्षीही महोत्सवानिमित्त महाप्रसाद सेवा,अभिषेक सेवा, हवन सेवा,पालखी सेवा,वस्त्रदान आदी विविध गुरुसेवा उपक्रमांमध्ये भक्तगणांना सहभागी होता येणार आहे. सर्व भाविकांनी कुटुंबियांसह उपस्थित राहून सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन
प. पू. सद्गुरू रमणनाथजी महाराज संजीवन समाधी ट्रस्ट
भोगावती नगर, श्रीक्षेत्र-तानसा, ता. शहापूर, जि.ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.





