राम मंदिर देणगी प्रकरणावरून शिवसेनेचे ‘राम रक्षा आंदोलन’; रामपूर गुढे फाटा येथे आमदार भास्कर जाधव यांचा भाजपवर हल्लाबोल
चिपळूण :

राम मंदिर देणगी प्रकरणावरून शिवसेनेचे ‘राम रक्षा आंदोलन’; रामपूर गुढे फाटा येथे आमदार भास्कर जाधव यांचा भाजपवर हल्लाबोल
चिपळूण (ओंकार रेळेकर)अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने राज्यभर सुरू असलेल्या ‘राम रक्षा आंदोलन’ अंतर्गत चिपळूण तालुक्यातील रामपूर गुढे फाटा येथील श्रीराम मंदिरात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत श्रीरामांची आरती, जयघोष आणि जनजागृती अभियान राबविण्यात आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार भास्करराव जाधव यांनी राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहारावरून भाजपवर जोरदार टीका केली. हिंदू समाजाच्या श्रद्धेचा गैरवापर झाल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.भाजपने हिंदुत्वाच्या नावावर जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत त्यांनी राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून जमा झालेल्या देणग्यांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच राम मंदिराच्या उभारणीच्या प्रक्रियेत आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्वांचा सहभाग अपेक्षित असताना काही निर्णय एकतर्फी घेतल्याची टीकाही त्यांनी केली.
राम मंदिरासाठी केवळ हिंदू समाजानेच नव्हे, तर विविध धर्म, पंथ आणि सर्व राजकीय पक्षांतील नागरिकांनी देणग्या दिल्या असल्याचे सांगत, त्या निधीच्या वापराबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच हिंदुत्वासाठी सातत्याने संघर्ष केल्याचा दावा त्यांनी केला.
या आंदोलनाला शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सुभाष जाधव, उपतालुकाप्रमुख संदीप चव्हाण, महिला आघाडी संघटक सुशीला पवार, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वंजारे, वर्षा चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.विभागप्रमुख संदीप घाग, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निंबाळकर, गौरव पाटेकर, प्रीतम वंजारे, मंगेश गुढेकर तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे आयोजन केले. परिसरातील मोठ्या संख्येने रामभक्त नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.




