संगमेश्वर मधील कोकणातील प्रसिद्ध श्री जाखमाता देवीचे शिंपणे उत्सव आज पासून सुरू
शिंपणे उत्सवाला संपूर्ण कोकणातून भक्तगण उपस्थित राहणार

चिपळूण (ओंकार रेळेकर) संगमेश्वर तालुक्यातील जुनेबंदर येथील श्री देवी जाखमाता देवीचा संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेला पारंपारिक शिंपणे उत्सव आज मंगळवार दि.१७ मार्च आणि बुधवार दि. १८ मार्च रोजी संपन्न होत आहे या शिंपणे महोत्सवांमध्ये संपूर्ण कोकणातून श्री जखमाता देवीचे भक्त सहभागी होऊन आनंद साजरा करतात देवीकडे मांडलेले गाऱ्हाणे पूर्णत्वास जाते अशी जाखमाता देवीची महाराष्ट्रभर आख्यायिका आहे.
संगमेश्वर तालुक्यातील जुनेबंदर येथे श्री जाखमाता देवीचा पारंपरिक शिंपणे उत्सव आज पासून सुरू होत आहे.आज आणि उद्या मोठ्या उत्साहात शिंपणे संपन्न होणार आहे. या दोन दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी भाविकांची मोठी उपस्थिती लाभणार आहे.या निमित्त मंदिर समितीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.आज मंगळवार दि.१७ मार्च रोजी सायं.५.३० वाजता देवीची रूपे लावण्यात येणार आहेत.रात्री १०.३० वाजता होलदेव,
नावडी,पागआळी,रामपेठ मार्गे पुन्हा होलदेवपर्यंत फेरा परतल्यानंतर गणपती मंदिर येथे भाविकांना घुगऱ्यांचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.बुधवार दि.१८ मार्च रोजी सकाळी१० ते ११ वेळेत देवीची पूजा व आराधना होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत होलदेव येथून नावडी,पागआळी,रामपेठ मार्गे जाखमाता मंदिरपर्यंत फेरा काढण्यात येईल. दुपारी ३ ते सायं. ७.३० वेळेत जाखमाता मंदिराजवळ नवस फेडण्याचा कार्यक्रम होईल.तसेच दुपारी ३.३० ते सायं.७.३० या वेळेत होलदेव येथून गणेशआळी,बाजारपेठ,पुन्हा गणेशआळी व रामपेठ मार्गे जाखमाता मंदिरापर्यंत फेरा काढण्यात येणार आहे.
सायंकाळी ७.३० वाजता पारंपरिक लेंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडेल.त्यानंतर रात्री १० ते १२ या वेळेत भाविकांसाठी भाकरी-मटणाचा महाप्रसाद वाटप होणार आहे.दरम्यान सकाळी ११ ते रात्री १२ या वेळेत भाविकांना श्री देवीचे दर्शन व ओटी भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.मुळचे जुने जाखमाता मंदिर कसबा,फणसवणे आणि संगमेश्वर बाजारपेठ येथे निनावी देवीचाही पारंपारिक पद्धतीने शिंपणे उत्सव पार पडणार आहे.भक्तगणांसाठी देवीचा मटण भाकरी प्रसाद रात्री १२ वाजेपर्यंतच वाटप करण्यात येणार आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी वेळेतच प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मानकरी श्री देवी जाखमाता मंदिर,जुनेबंदर संगमेश्वर यांनी केले आहे.



