Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

‘मानहानीच्या कारवाईची भीती दाखवण्यापेक्षा अनियमिततेचा हिशोब द्या’ : इनायत मुकादम

शिवजयंती उत्सवातील कथित गैरव्यवहार, अनियमितता व बोगस दरपत्रकाच्या आरोपांवर ठाम

चिपळूण (ओंकार रेळेकर)शिवजयंती उत्सव कार्यक्रमातील कथित गैरव्यवहार, अनियमितता व बोगस दरपत्रकाबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर चिपळूण नगर पालिकेच्या मिळकत व्यवस्थापन विभागाकडून मानहानीच्या कारवाईचा इशारा देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर तक्रारदार व माजी नगरसेवक इनायत इब्राहिम मुकादम यांनी नगर पालिकेला विस्तृत खुलासा दिला आहे. नगर पालिकेने केलेले आरोप पूर्णपणे नाकारत, आपल्या तक्रारीवर आपण ठाम असल्याचे सांगत त्यांनी ते आव्हान स्वीकारले आहे. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली.
इनायत मुकादम म्हणाले, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी चिपळूण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी संजय जाधव यांना लेखी खुलासा सादर केला. नगर पालिकेच्या जावक क्रमांक १७२७, मिळकत व्यवस्थापन/२०२६-२७, दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्राचा संदर्भ देत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
नगर पालिकेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालातील मजकूर खोटा, खोडसाळ, दिशाभूल करणारा असल्याचा आरोप मुकादम यांनी केला आहे. आपल्या तक्रारीतील आक्षेपांबाबत प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध असून आपण आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
 ‘ठेकेदाराने काम नाकारल्याचा पुरावा कुठे?’*
नगर पालिकेने प्रस्तावित कामासाठी वार्षिक ठेकेदार राज डेकोरेटर्स यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी काम करण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराला कामाबाबत विचारणा करण्यात आली किंवा त्याने काम करण्यास नकार दिला, यासंदर्भातील कोणताही लेखी पत्रव्यवहार नगरपालिकेच्या संचिकेत उपलब्ध नसल्याचा दावा मुकादम यांनी केला आहे.
तसेच शहरातील इतर व्यावसायिकांशी कामाबाबत चर्चा करण्यात आली; मात्र कोणत्याही व्यावसायिकाने काम करण्याची तयारी दर्शविली नाही, असा नगर पालिकेचा दावा असल्याचे मुकादम यांनी म्हटले आहे. या चर्चेचा किंवा व्यावसायिकांनी काम नाकारल्याचा कोणताही लेखी पुरावा नगरपालिकेकडे असल्याचे दिसून येत नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे.
 *‘दरपत्रक मागवण्यासाठी जाहिरात केली का?’*
सदर कामासाठी दरपत्रक मागविण्याची कोणतीही नोटीस नगरपालिकेच्या नोटीस बोर्डवर किंवा वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचा मुद्दाही मुकादम यांनी उपस्थित केला आहे.
तुलनात्मक स्पर्धेसाठी वापरण्यात आलेली दरपत्रके चिपळूणपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या कराड येथील व्यावसायिकांकडून सादर करण्यात आल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कराड येथील व्यावसायिकांशी नेमका कोणी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून कोटेशन कशा पद्धतीने प्राप्त करण्यात आले, याचा खुलासा नगरपालिकेने करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 *‘नगर पालिकेचे आव्हान मी स्वीकारले’*
शहराबाहेरील व्यावसायिकांशी चर्चा करावी किंवा त्यांना समोरासमोर आणावे आणि आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान नगरपालिकेकडून देण्यात आल्याचा उल्लेख मुकादम यांनी केला आहे.
हे आव्हान आपण स्वीकारले असून आपले आरोप सिद्ध करण्यास आपण निश्चितच तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी नगरपालिकेच्या स्तरावर सुनावणीची तारीख, वेळ व ठिकाण निश्चित करून त्याची माहिती आपल्याला देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 *‘व्यक्तिगत द्वेषाचा प्रश्नच नाही’*
आपण मिळकत व्यवस्थापकाविरुद्ध व्यक्तिगत द्वेषातून किंवा बदनामीच्या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली असल्याचे नगरपालिकेच्या अहवालात नमूद असल्याचा दावा मुकादम यांनी केला आहे. मात्र, संबंधित मिळकत व्यवस्थापकासोबत आपला कोणत्याही स्वरूपाचा व्यक्तिगत वाद, भांडण किंवा आर्थिक देवाणघेवाण नाही. तसेच ते आपल्या नात्यातील किंवा गावाकडीलही नसल्याचे मुकादम यांनी स्पष्ट केले.कामातील कथित अनियमितता व गैरव्यवहाराची जाणीव असल्याने संबंधितांकडून स्वतःचा बचाव करण्यासाठी व्यक्तिगत द्वेषाचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
 *‘मानहानीची भीती दाखवण्यापेक्षा नियमांचे पालन करा’*
नगरपालिकेच्या अहवालातील शेवटच्या परिच्छेदात शासकीय कर्मचाऱ्याची कर्तव्य बजावताना खोटी बदनामी करणे तसेच वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध करणे यासंदर्भात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५६ अन्वये दिवाणी अथवा फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याचे मुकादम यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर कायद्याची भीती दाखवण्याऐवजी नगरपालिका अधिनियमातील तरतुदी, स्थायी निर्देश आणि नागरी सेवा शर्तींचे पालन करावे, असे त्यांनी सुनावले आहे.
नगरपालिकेकडून कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नसेल, तर कायद्याच्या आधारे आपल्या विरोधात कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यास आपली कोणतीही हरकत नसल्याचेही मुकादम यांनी स्पष्ट केले. उलट, अशी कायदेशीर कारवाई करण्यास आपण तयार असून त्याचे स्वागत करू, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली आहे.
हा विषय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या न्याय प्राधिकरणाकडे न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत अधिक भाष्य करीत नसल्याचेही मुकादम यांनी खुलाशात नमूद केले आहे.दरम्यान, शिवजयंतीवर करण्यात आलेल्या खर्चाबाबत आपला आक्षेप नसून खर्चासाठी राबविलेली प्रक्रिया चुकीची असल्याचे मत इनायत मुकादम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.या खुलाशाची प्रत रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती व पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहे. आता या आरोपांवर चिपळूण नगरपालिकेकडून काय भूमिका घेतली जाते आणि प्रस्तावित कामातील दरपत्रके, संबंधित पत्रव्यवहार व प्रक्रियेबाबत कोणते पुरावे सादर केले जातात, याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!