महाराष्ट्र

घरडा केमिकल्सला FICCI चे दोन राष्ट्रीय पुरस्कार CSR उपक्रम आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराबद्दल लोटे येथील कंपनीचा गौरव

लोटे :

चिपळूण (ओंकार रेळेकर) : लोटे येथील घरडा केमिकल्स लिमिटेड या कंपनीने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले असून, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारे दोन प्रतिष्ठित पुरस्कार कंपनीला मिळाले आहेत. यामध्ये ‘उत्कृष्ट सामाजिक योगदान (CSR) पुरस्कार २०२६’ आणि ‘डिजी टेक फ्रंट रनर ऑफ द इयर पुरस्कार २०२६’ यांचा समावेश आहे.
रसायने आणि पेट्रोकेमिकल्स उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी आयोजित ‘केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स इंडस्ट्री अवॉर्ड्स २०२६’ या पुरस्कार सोहळ्यात घरडा केमिकल्सचा सन्मान करण्यात आला. कंपनीने सामाजिक उत्तरदायित्वांतर्गत राबविलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी पहिला, तर आधुनिक डिजिटल प्रणालींच्या प्रभावी वापरासाठी दुसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, गुहागर आणि दापोली तालुक्यांतील ग्रामीण भागाच्या विकासासाठी कंपनीकडून विविध सामाजिक प्रकल्प राबविण्यात येतात. यामध्ये शैक्षणिक उपक्रम, पाणीपुरवठा योजना, महिला सक्षमीकरण, डिजिटल स्कूल, विज्ञान प्रयोगशाळा, शाळांची दुरुस्ती, शालेय स्वच्छतागृहांची उभारणी, दिव्यांगांसाठी तपासणी व सहाय्यभूत साहित्य वाटप, कृषी विकास, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन यांचा समावेश आहे.
या उपक्रमांमुळे ग्रामीण नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास, विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यास आणि स्थानिक समुदायाचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. सामाजिक विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील पारदर्शकता, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या वैशिष्ट्यांमुळे कंपनीने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
२२ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील आयटीसी मराठा येथे झालेल्या समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या यशामुळे कंपनीच्या सामाजिक बांधिलकीला आणि शाश्वत विकासासाठीच्या योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!