Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

कामथे नदीपात्रात हॉस्पिटलचा घातक कचरा; ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट, कठोर कारवाईची मागणी

चिपळूण :


कामथे गावातील नदी परिसर हा लोकवस्तीच्या अगदी जवळ असून ग्रामस्थ दैनंदिन वापरासाठी या ठिकाणी येत असतात. अनेक महिला येथे कपडे धुण्यासाठी येतात, तर शेतकरी आपल्या गुरांना पाणी पाजण्यासाठी नदीकाठाचा वापर करतात. अशा महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी वैद्यकीय कचरा टा


कण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घटनास्थळी वापरलेल्या सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन, सुया तसेच विविध प्रकारचे वैद्यकीय साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. हा कचरा संसर्गजन्य असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीपात्रात अशा प्रकारचा जैववैद्यकीय कचरा टाकणे हे पर्यावरणासाठी तसेच मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक मानले जाते.
स्थानिक नागरिकांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर कामथे ग्रामपंचायतीच्या सरपंच अक्षदा कासार, हरी कासार, तेजस कदम तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या गंभीर प्रकाराबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून दोषी व्यक्ती किंवा संस्थेचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या मते, अशा प्रकारे हॉस्पिटलमधील कचरा नदीपात्रात टाकणे म्हणजे पर्यावरणीय नियमांचे उघड उल्लंघन असून यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका वाढू शकतो. विशेषतः लहान मुले, महिला आणि जनावरे यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, संबंधित वैद्यकीय कचरा कोणत्या रुग्णालयातून किंवा संस्थेतून आणण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने तत्काळ तपास सुरू करावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा कामथे ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
“नदीपात्रात वैद्यकीय कचरा टाकणाऱ्यांचा शोध घ्या आणि कठोर कारवाई करा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा स्थानिकांनी प्रशासनाला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!