Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

चिपळूणच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही- पालकमंत्री उदय सामंत

जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणच्या सदस्यांनी घेतली भेट

रत्नागिरी (ओंकार रेळेकर)चिपळूण शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी यापूर्वीही आपण कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असून त्यातून भरीव कामे मार्गी लागली आहेत. यापुढेही चिपळूणच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी निःसंदिग्ध ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.उदय सामंत यांनी जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण या संस्थेच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिली.

संस्थेचे अध्यक्ष सुनील साळवी ,उपाध्यक्ष गजेंद्र खडपे,सचिव दीपक शिंदे,खजिनदार संतोष पिलके, सदस्य ओंकार रेळेकर, ललेश कदम आदी सदस्यांनी ना. सामंत यांची भेट घेऊन पत्रकारांचे प्रश्न आणि चिपळूणच्या विकासासंदर्भात चर्चा केली. नामदार सामंत यांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने चर्चेला प्रतिसाद दिला.

चिपळूणमध्ये आपण दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून भरीव कामे झाली आहेत. पालिकेच्या नवीन इमारतीला आवश्यक निधी दिला असून शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना सात कोटी रुपयांचा नुकताच निधी वितरित केला. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने चिपळूण शहर विकासासाठी आपण आखडता हात घेणार नाही असे वचन त्यांनी दिले. चिपळूणमध्ये नगराध्यक्ष सकपाळ व त्यांचे सर्व सहकारी शहर विकासासाठी पूर्ण योगदान देत आहेत. शहर विकासाला आपले पूर्ण सहकार्य राहील असे त्यांनी स्पष्ट केले.

चिपळूणला नेहमी वाशिष्टीच्या पुराचा धोका संभवतो. यावेळी जगबुडी आणि वाशिष्ठी नदीपात्रातील गाळ मोठ्या प्रमाणात काढला असल्यामुळे यंदा पुराची तीव्रता कमी झाली. पुरामुळे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी नुकसानग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगून ते म्हणाले की, कोणताही प्रकल्प किंवा महत्त्वाची योजना राबवायची असल्यास जनतेची सकारात्मक मानसिकता आवश्यक आहे. एखाद्या प्रकल्पाचे स्वागत केल्यास अनेकांना रोजगारची संधी मिळते आणि आर्थिक सुबत्ता येते. विकासासाठी अशी सकारात्मक मानसिकता आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

*एमआयडीसी आणि उद्योग बंद पडू देणार नाही*

जिल्ह्यात नवनवीन उद्योग आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यंदा पाऊस लांबला आणि एमआयडीसी मधील उद्योग संकटात सापडले. मात्र एकही उद्योग, कारखाने आपण बंद पडू देणार नाही असे राज्याचा उद्योगमंत्री म्हणून आपण ठामपणे सांगतो असे त्यांनी आत्मविश्वासपूर्वक नमूद केले

*रत्नागिरीत खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी प्रकल्प*

मुंबईत पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी समुद्रातील खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी बनवण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.त्याकरिता निधी मंजूर झाला आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरीतही असा प्रकल्प राबविण्याचा आपला मानस असून भविष्यात रत्नागिरीत असा प्रकल्प उभा राहिलेला दिसेल अशी भावी योजनाही त्यांनी स्पष्ट केली.

चिपळूण परिसराच्या विकासासाठी पत्रकारांनी मांडलेले मुद्दे..

*चिपळूण नगरपालिकेला विकास कामांसाठी निधीची आवश्यकता असून आपण निधी उपलब्ध करून द्यावा,पाण्याअभावी एमआयडीसीमधील उद्योग बंद पडू नयेत, यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी, जगबुडी आणि वाशिष्ठी या दोन नद्यांचा संगम होतो आणि त्यामुळे वशिष्टीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी वेळ लागतो. यावर प्रांताधिकारी यांनी सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी. पर्यटनाच्या माध्यमातून चिपळूणचा विकास व्हावा आणि त्यासाठी पत्रकार म्हणून वाटेल ते सहकार्य करायला आम्ही तयार असू असे विकासात्मक मुद्दे पत्रकारांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या सर्व विषयांवर पालकमंत्र्यांनी सकारात्मक उत्तरे दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!