भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यअहवाल प्रसिद्ध
बंदरविकास मंत्री नितेश राणे,मंत्री आशिष शेलार,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट; जिल्ह्यातील विकासकामे व पक्षसंघटना वाढीवर महत्त्वपूर्ण चर्चा

बंदरविकास मंत्री नितेश राणे,मंत्री आशिष शेलार,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट; जिल्ह्यातील विकासकामे व पक्षसंघटना वाढीवर महत्त्वपूर्ण चर्चा
चिपळूण (ओंकार रेळेकर) : भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांच्या कार्यकाळातील विविध उपक्रम, संघटनात्मक कामकाज आणि जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेणारा कार्यअहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कार्यअहवालाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्न व विकासकामांसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती मांडण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी मुंबई येथे राज्याचे बंदरविकास मंत्री ना. नितेश राणे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना हा कार्यअहवाल भेट दिला. यावेळी यादव यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या कामकाजाबरोबरच विविध विकासकामांबाबतची माहिती मंत्री नितेश राणे यांच्यासमोर मांडली.या भेटीदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, आवश्यक असलेली नवीन विकासकामे, स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न तसेच आगामी काळात जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी, पक्षाचा विस्तार तळागाळापर्यंत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करण्यासंदर्भातही महत्त्वपूर्ण विचारविनिमय करण्यात आला.
प्रशांत यादव यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षसंघटना वाढविण्यासोबतच विविध सामाजिक, विकासात्मक आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने पाठपुरावा करण्यावर भर दिला आहे. बूथ पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत संघटना सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद, बैठका आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले. या वर्षभरातील कामाचा लेखाजोखा कार्यअहवालाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विविध भागांतील नागरिकांचे प्रश्न, पायाभूत सुविधांची आवश्यकता, विकासकामांना चालना देणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांचाही कार्यअहवालात आढावा घेण्यात आला आहे.

पक्षसंघटना आणि विकासकामे या दोन्ही आघाड्यांवर आगामी काळात अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार या भेटीत व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील विकासाला गती देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी वर्षभराच्या कार्याचा अहवाल थेट मंत्री नितेश राणे यांना सादर केल्याने पक्षाच्या संघटनात्मक कामकाजासोबतच जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांनाही शासनदरबारी अधिक प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.




