कॉमनवेल्थ कबड्डी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक; चिपळूणच्या शुभम शिंदेची उत्कृष्ट कामगिरी
नगराध्यक्ष तथा रत्नागिरी कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याकडून विशेष अभिनंदन

चिपळूण (ओंकार रेळेकर )पहिल्या कॉमनवेल्थ कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने दमदार आणि ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या विजयी भारतीय संघाचा सदस्य असलेल्या चिपळूण तालुक्याच्या सुपुत्र तथा आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू शुभम शिंदे यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून भारताच्या या ऐतिहासिक सुवर्णयशात मोलाचे योगदान दिले आहे.*
*भारतीय संघाच्या या दैदिप्यमान यशानंतर सुवर्णपदक विजेत्या संघाचा सदस्य म्हणून चिपळूणमध्ये परतलेल्या शुभम शिंदे याचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी चिपळूणचे नगराध्यक्ष तथा रत्नागिरी कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. उमेश धोंडीराम सकपाळ यांनी शुभम शिंदे याची विशेष भेट घेऊन त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.कबड्डी क्षेत्राशी जवळून संबंध असलेल्या नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शुभम शिंदे यांच्या यशाचे विशेष कौतुक केले. चिपळूणच्या मातीतून घडलेल्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून देशासाठी सुवर्णपदक जिंकण्यात योगदान देणे ही चिपळूणकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.नगराध्यक्ष सकपाळ यांनी सांगितले की, “शुभम शिंदे याने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर भारतीय संघात स्थान मिळविले आणि पहिल्याच कॉमनवेल्थ कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून भारताच्या सुवर्णयशात योगदान दिले. त्याची ही कामगिरी चिपळूणमधील युवा खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.”शुभम शिंदे यांच्या चिपळूण आगमनानंतर झालेल्या स्वागतावेळी प्रसिद्ध व्यावसायिक अरुण भोजने, बांधकाम सभापती कपिल शिर्के, नगरसेविका राणी महाडिक व नीलम जाधव, नगरसेवक गणेश आग्रे, उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, तसेच करामत मिठागरी, सुधाकर सकपाळ, संदेश गोरिवले, फैसल मेमन, भाऊ भाटकर, जॉन महाडिक, बाबू गोलांबडे, नरेश सोळंकी आणि वसीम चिपळूणकर उपस्थित होते.पहिल्याच कॉमनवेल्थ कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला असून, या यशात चिपळूणच्या शुभम शिंदे यांच्या उत्कृष्ट कामगिरीने विशेष भर घातली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे केवळ चिपळूणच नव्हे, तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला आहे.नगराध्यक्ष तथा रत्नागिरी कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. उमेश धोंडीराम सकपाळ यांच्या हस्ते शुभम शिंदे याचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही शुभम शिंदे याचे कौतुक करून त्याच्या पुढील आंतरराष्ट्रीय क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.शुभम शिंदे यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या माध्यमातून चिपळूणचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले असून, त्यांच्या या यशामुळे तालुक्यातील अनेक युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळणार आहे. आगामी काळातही शुभम शिंदे यांनी भारतीय कबड्डी संघासाठी अशीच दमदार कामगिरी करून देशाचे आणि चिपळूणचे नाव आणखी उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी दिल्या.
फोटो : शुभम शिंदे यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल शुभेच्छा देताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ आणि कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




