स्वामिनी यादव हिचे एमबीबीएस परीक्षेत उज्ज्वल यश
प्रशांत यादव आणि सौ. स्वप्ना यादव यांच्या कन्येच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नावर यशाची मोहोर!

यादव आणि चव्हाण कुटुंबियांत आनंदोत्सव; जिल्ह्याभरातून अभिनंदनाचा वर्षाव
चिपळूण (ओंकार रेळेकर)भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक तथा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांची कन्या स्वामिनी यादव हिने एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे यादव आणि चव्हाण कुटुंबीयांमध्ये आनंदाचे व उत्सवाचे वातावरण असून संपूर्ण जिल्हाभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्वामिनी यादव ही चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण आणि ज्येष्ठ संचालिका स्मिताताई चव्हाण यांची नात असून, लहानपणापासूनच तिला अभ्यासाची आवड आणि उच्च ध्येयाची जाणीव होती. आठवी इयत्तेत असतानाच डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने पाहिले आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली. तिचे माध्यमिक शिक्षण परशुराम (ता. चिपळूण) येथील एस.पी.एम. शाळेत झाले. दहावीच्या शालांत परीक्षेत तिने ९०.२० टक्के गुण मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तिने चिपळूणमधील डी.बी.जे. महाविद्यालयाची निवड केली. बारावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवत तिने आपल्या यशाचा आलेख अधिक उंचावत ठेवला.
बारावीतील उत्कृष्ट यशाच्या जोरावर तिला कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तिने एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेतही उल्लेखनीय यश मिळवत डॉक्टर होण्याच्या स्वप्नाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.
घरच्या वातावरणात सहकार आणि राजकारणाचे बाळकडू मिळत असतानाही स्वामिनीला स्वतःचे वेगळे ध्येय गाठण्याची प्रेरणा मिळाली. वडील प्रशांत यादव, आई सौ. स्वप्ना यादव यांच्यासह यादव व चव्हाण कुटुंबीयांनी तिला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य आणि भक्कम पाठबळ दिले. स्वामिनीच्या या यशामुळे यादव आणि चव्हाण कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, तिच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
माझ्या कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळेच स्वप्न पूर्ण : स्वामिनी यादव
माझ्या या यशात माझ्या कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि प्रोत्साहनामुळेच मी हे यश गाठू शकले. त्यांच्यामुळेच माझे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले, याचा मला अभिमान वाटतो, अशी भावनिक प्रतिक्रिया स्वामिनी हिने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. यापुढे मास्टर्स करण्याचे आपले ध्येय आहे असेही तिने स्पष्ट केले.




