Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

शिवाजीनगर सी.एन.जी पंपाचा ‘धडधडता’ आवाज ..नगरसेवक शशिकांत मोदी ,नगरसेविका अंजली कदम यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब,१५ दिवसांत तोडगा नाही तर आंदोलनाचा इशारा

म्प्रेसरचा १०० डेसिबलपर्यंत आवाज; ३०० रहिवाशांचा संताप, आरोग्यावर परिणाम

चिपळूण (ओंकार रेळेकर)शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या CNG पंपावरील कॉम्प्रेसरमुळे होणाऱ्या तीव्र आवाज प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गंभीर समस्येविरोधात नगरसेविका अंजली सतीश कदम व नगरसेवक शशिकांत मोदी यांनी आक्रमक भूमिका घेत, संबंधित महानगर गॅस व्यवस्थापनाला धारेवर धरले आहे. तातडीने ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शिवाजीनगर येथील महानगर गॅस पंप स्टेशनलगतच कॉम्प्रेसर मशीन बसविण्यात आले असून, त्याच्या अगदी शेजारीच प्रथमेश अपार्टमेंटचे फेज १.२ आणि ३ असे सुमारे ३०० नागरिकांचे निवासी संकुल आहे. गेल्या अडीच वर्षांपासून येथील रहिवाशांना या मशीनमधून होणाऱ्या प्रचंड आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक यामुळे त्रस्त झाले आहेत.निवेदनानुसार, कॉम्प्रेसरमधून निर्माण होणारा आवाज रात्रीच्या वेळी ९९ ते १०० डेसिबलपर्यंत पोहोचतो. त्यामुळे रक्तदाब वाढणे, कानाचे विकार, झोप न लागणे तसेच मानसिक तणाव अशा विविध आरोग्य समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.या संदर्भात प्रदूषण नियंत्रण विभाग, प्रांत कार्यालय आणि चिपळूण पोलीस ठाणे येथे वारंवार पाठपुरावा करूनही व्यवस्थापनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.दरम्यान, नगरसेवकांच्या हस्तक्षेपानंतर महानगर गॅस व्यवस्थापनाला कॉम्प्रेसरबाबत योग्य तो निर्णय होईपर्यंत रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत पंप बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्या व्यवस्थापनाने मान्य केल्या आहेत. तसेच ध्वनी व वायू प्रदूषणाचे अचूक मोजमाप करण्यासाठी संबंधित विभागाचे विशेष पथक बोलावून नगरसेवकांच्या उपस्थितीत डेसिबल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.याशिवाय, कॉम्प्रेसर मशीनचे स्थलांतर लवकरात लवकर करण्याचे आश्वासनही व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहे.मात्र, येत्या १५ दिवसांत समाधानकारक तोडगा न निघाल्यास नागरिकांसह महानगर गॅस कार्यालयासमोर तसेच संबंधित पंपावर आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा नगरसेविका अंजली कदम व नगरसेवक शशिकांत मोदी यांनी दिला आहे.
या वेळी पत्रकार सतीश कदम तसेच प्रथमेश अपार्टमेंटचे पदाधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे.

फोटो : महानगरगॅसच्या व्यवस्थापकांना निवेदन देताना नगरसेवक शशिकांत मोदी ,नगरसेविका अंजली कदम,सतीश कदम तसेच प्रथमेश अपार्टमेंटचे च पदाधिकारी दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!