राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सावर्डेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या पुढाकारातून सामाजिक उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

चिपळूण (ओंकार रेळेकर) जननायक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सावर्डे येथील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि त्यांना आवश्यक साहित्याची मदत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी आयोजित करण्यात आला.
यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा यांनी प्रमुख उपस्थिती लावत विद्यार्थ्यांना वह्या, पेन व अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षण हेच यशाचे खरे साधन असून प्रत्येक विद्यार्थ्याने जिद्द, मेहनत आणि सातत्य यांच्या बळावर आपले भविष्य घडवावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात रफिकभाई मोडक, कैसरभाई देसाई, कमलेश देसाई, विनायक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संदेश दिला.
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि शिक्षणाबाबत निर्माण झालेला उत्साह हा या उपक्रमाचा खरा यशस्वी परिणाम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
काँग्रेस पक्षाच्या वतीने भविष्यातही समाजोपयोगी आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
फोटो : बालविद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग आणि काँग्रेस कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




