Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

सर्वसामान्य कार्यकर्ताच शिवसेनेला पुन्हा वैभव प्राप्त करून देईल; निवडणुकांसाठी आतापासूनच सज्ज व्हा – विक्रांत जाधव

चिपळूण :

चिपळूण (ओंकार रेळेकर): महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्ताच आगामी काळात शिवसेनेला नवसंजीवनी देऊन पक्षाला पुन्हा वैभवाच्या शिखरावर नेईल. भूतकाळातील घडामोडींमध्ये न अडकता आता आगामी सर्व निवडणुकांच्या दृष्टीने संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आतापासूनच कामाला लागावे. प्रामाणिक परिश्रम, संघटनशक्ती आणि जनसंपर्काच्या बळावर यश निश्चितपणे शिवसेनेलाच मिळेल, असा ठाम विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी व्यक्त केला.
रविवारी सकाळी रामपूर येथील चैतन्य हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या ठाकरे शिवसेना पक्षाच्या शाखाप्रमुख व कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. या मेळाव्याला शाखाप्रमुख, बी.एल.ओ., सरपंच, विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या मेळाव्यात आगामी राजकीय घडामोडी, संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.विक्रांत जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पक्षाची खरी ताकद ही तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. प्रत्येक गावात, वाडी-वस्तीत आणि बूथ स्तरावर संघटना अधिक मजबूत करण्याची गरज आहे. जनतेच्या प्रश्नांशी सातत्याने जोडले राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारी स्वीकारून पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तालुका प्रमुख सुभाष जाधव यांच्या हस्ते जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात विक्रांत जाधव यांनी तालुका प्रमुख सुभाष जाधव यांच्या संघटनात्मक कार्याचे विशेष कौतुक केले. चिपळूण तालुक्यात सर्वाधिक बी.एल.ओ. नियुक्त करण्यात आल्याने संघटना अधिक बळकट होत असल्याचे सांगत त्यांनी सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. या मेळाव्यास शिवसेना तालुका प्रमुख सुभाष जाधव, उपतालुका प्रमुख लक्ष्मण कोकमकर, विभाग प्रमुख संदीप चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य पिंट्या निवळकर, पंचायत समिती सदस्य गौरव पाटेकर, प्रीतम वंजारे, सौ. वंजारे, संजीवनी खापरे, नितीन निकम, फैयाज शिरळकर, नंदू चव्हाण, दीपक शिर्के, उपविभाग प्रमुख खोपडर, भिकाजी भुवड, रघुनाथ चाळके, राम डीगे, रवी कदम, रघुनाथ सावंत, प्रभाकर जाधव, विभाग प्रमुख रमेश कुंभार, मंगेश गुडेकर यांच्यासह विविध पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
मेळाव्याच्या माध्यमातून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत जनतेशी संपर्क वाढवून शिवसेनेची विचारधारा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

फोटो : शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांचा सत्कार करतांना सुभाष जाधव आणि पदाधिकारी
छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!