अर्थ व कृषी क्रांतीतून कोकणात समृद्धी* : *वाशिष्ठी दुग्ध प्रकल्प ठरतोय तरूणांना प्रेरणादायी
कृषी दिन विशेष...

येथील वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस् तसेच चिपळूण नागरी पतसंस्थेतर्फे दरवर्षी शेतकर्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. कोकणातील शेतकरी आत्मनिर्भर झाला पाहिजे या हेतूने सुरू झालेली वाशिष्ठी डेअरी शेतकर्यांसाठी वरदान ठरत आहे. दुसर्या बाजूला चिपळूण नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकर्यांची पत वाढविण्यासाठीही ही संस्था महत्त्वाचे योगदान देत आहे. चिपळूण नागरीचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण आणि वाशिष्ठी मिल्कचे चेअरमन प्रशांत यादव तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्या कल्पकतेतून कोकणच्या कृषी क्रांतीला बळ मिळत आहे. त्यामुळे कोकणात अर्थ व कृषी क्रांती घडून येत असून जागतिक कृषीदिनाच्या पार्श्वभूमीवर या दोन संस्था शेतकर्यांसाठी वरदान ठरत आहेत. येथील वाशिष्ठी दुग्ध प्रकल्प तरूणांसाठी प्रेरणादायी बनला आहे.
‘आपली माणसे आपली संस्था’ आणि ‘कणा कणात कोकण’ हे ब्रीदवाक्य घेऊन चिपळूण नागरी व वाशिष्ठी डेअरी कोकणच्या समृद्धीसाठी कार्यरत झाली आहे. सुरुवातीला म्हणजे तब्बल 33 वर्षे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था येथील शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाचा आधार ठरली आहे. ग्रामीण भागातील शेतकर्यांनी लघु उद्योग निर्माण करावेत, त्यातून त्यांनी आपली आर्थिक समृद्धी साधावी या हेतूने चिपळूण नागरीच्या माध्यमातून ग्रामीण, गरजू लोकांना पतपुरवठा केला जात आहे. अनेक राष्ट्रीय बँका ज्या लोकांना आपल्या दारात उभ्या करीत नाहीत अशा लोकांना आणि शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी चिपळूण नागरी पतसंस्था महत्त्वाची ठरली आहे. या मध्यमातून अनेक कर्जविषयक योजना राबविल्या जात आहेत. या शिवाय महिला बचत गटांनाही ही संस्था आधारभूत ठरली आहे. ग्रामीण भागातील शेतकर्यांना कृषीपूरक कर्ज योजना, पर्यटन विकास, गाई-म्हशी घेण्यसाठी कर्ज योजना, शेतकर्यांसाठी कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. त्यातून अनेक शेतकरी सक्षम झाले आहेत. गेली अनेक वर्षे चिपळूण नागरी सह. पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष चव्हाण आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या संकल्पनेतून शेतकर्यांना बळ मिळत आहे. त्यातून अनेक लोक शेतीकडे वळू लागले आहेत.
कोकणचा शेतकरी कोकणातच राहिला पाहिजे, येथील तरूणाला त्याच्या गावातच काम मिळाले पाहिजे या हेतूने वाशिष्ठी डेअरीची स्थापना झाली आणि खर्या अर्थाने कोकणात धवलक्रांती आली असे म्हणावे लागेल. आज रत्नागिरी जिल्ह्यात अनेक तरूण दुग्धव्यवसायाकडे वळले आहेत व दर महिन्याला लाखो रूपयांचे उत्पन्न वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून घेऊ लागले आहेत. गाई-म्हशी घेऊन शेतीकडे येथील तरूण वळत आहे. याचे श्रेय या दोन संस्थांना जाते. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून दुध आणि दुग्धजन्य उत्पादने तयार करून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दूध, दही, तूप, ताक, श्रीखंड, आम्रखंड, लस्सी, आईस्क्रीम, पनीर अशी अनेक दर्जेदार उत्पादने कोकणातील लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. वाशिष्ठी शॉपीच्या माध्यमातून देखील अनेकांना रोजगार मिळाला आहे. ‘पैशातून शेती आणि शेतीतून पैसा’ असे चक्र चिपळूण नागरी आणि वाशिष्ठीने निर्माण केले आहे. त्यामुळे कोकणातील बळीराजा आता समृद्ध होत आहे.
वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून सलग तीन वर्षे चिपळूणमध्ये कोकण विभागातील पहिले भव्य असे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद देखील मिळाला. या प्रदर्शनात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांनी देखील भेटी दिल्या. शालेय विद्यार्थी, शेतकरी, युवक यांच्यासाठी हे कृषी प्रदर्शन प्रेरणादायी ठरले. त्यातून आज अनेक लोक शेतीकडे वळत आहेत. जागतिक कृषी दिनाच्या निमित्ताने चिपळूण नागरी व वाशिष्ठीने सुरू केलेली ही कृषी चळवळ कोकणच्या समृद्धीसाठी महत्त्वाचा मानबिंदू ठरणार आहे.
एकीकडे लोक शेती करणे सोडून देत असताना… भातशेती ओसाड होत असताना.. दुसर्या बाजूला अर्थक्रांती व कृषी क्रांतीच्या माध्यमातून कोकणात या संस्था समृद्धी आणत आहेत. त्याचे श्रेय वाशिष्ठी मिल्कचे चेअरमन प्रशांत यादव, चिपळूण नागरीचे संस्थापक-अध्यक्ष सुभाष चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव व सर्व संचालक मंडळ व त्यांच्या कर्मचार्यांना जाते.
कोकणच्या मातीत पेराल ते उगवते हे या संस्थेने सिद्ध केले आहे. यामुळे आज कोकणचा नवतरूण शेतीकडे वळू लागला आहे. कोकणात झालेल्या भव्य कृषी प्रदर्शनाने अनेकांना शेतीचा आदर्श घालून दिला आणि गावाकडे येण्याचा एक विचार रूजला. त्यातून आज अनेक तरूण नवनवीन यंत्र, अवजारे घेऊन गावखेड्यात शेती करू लागले आहेत. त्यात भर म्हणून दुग्ध व्यवसायाच्या निमित्ताने वाशिष्ठी व चिपळूण नागरीचे सहकार्य मिळाले आहे. त्यातून कोकणचा शेतकरी घडत आहे. आगामी काळात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून कोकणात धवल क्रांती करण्याचा संकल्पच या संस्थेने सोडला आहे. कृषी क्रांती व अर्थक्रांतीच्या माध्यमातूनच कोकणचा कायापालट होऊ शकेल असा गाढ विश्वास सुभाषराव चव्हाण यांना आहे. त्यामुळे कृषीदिनाच्या निमित्ताने कोकणातील तरूणांनी शेतीकडे वळावे. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करावा. गाई-म्हशीसाठी आम्ही पतपुरवठा करू. फार्म हाऊस, होमस्टे उद्योगासाठी सहकार्य करू, महिला बचतगटांना आर्थिक मदत करू, फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा. या मातीत सोने पिकविण्याची क्षमता आहे. फक्त साथ द्या. कोकण निश्चितच सुजलाम् व सुफलाम् होईल, असा आशावाद कृषीदिनाच्या निमित्ताने या संचालकांनी व्यक्त केला आहे.
*चौकट ः*
‘वाशिष्ठी’च्या दुधगंगेने आर्थिक बळ..
वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस् ही सहकारावर आधारलेली संस्था आज कोकणच्या शेतकर्यांसाठी दुधगंगा ठरली आहे. या संस्थेच्या माध्यमातून शेतकर्यांना दर दहा दिवसांनी दुधाचे बिल अदा केले जाते. त्यामुळे कोकणसाठी ही एक धवल क्रांतीच घडून आली आहे. दिवसेंदिवस दुग्ध व्यवसाय करणार्या शेतकर्यांमध्ये वाढ होत असून कोकणच्या कृषी चळवळीला खरा ‘अर्थ’ मिळाला आहे. वाशिष्ठी मिल्कच्या माध्यमातून मालघर, पिंपळी, दापोली, आंबडस, खेरशेत, वणौशी, दस्तुरी, करंजाडी, महाड, खंडाळा, वेरळ या ठिकाणी 11 बीएमसी आहेत तर 78 दूध संकलन केंद्रांच्या माध्यमातून सुमारे 15 हजार शेतकरी या दुग्ध व्यवसायासाठी जोडले आहेत. 90 शॉपींच्या माध्यमातून ‘वाशिष्ठी’ची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत असून 210 वितरक तर 18 हजार 500 दुय्यम विक्रेते आज वाशिष्ठीची दुग्ध उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवित आहेत. वाशिष्ठी डेअरीची उत्पादने रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच मुंबई, ठाणे, पाटण, कराड, सातारा, नगर, सिंधुदुर्ग, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये वितरित होत आहेत. या माध्यमातून कोकणच्या शेतकर्याला आर्थिक बळ आले आहे.




