वादळी वाऱ्याने उडालेला रामपूर आरोग्य केंद्राचा पत्रा अद्याप बसविला नाही; निधीसाठी पाठपुराव्याची मागणी
उमरोली जि. प. सदस्य प्रमोद निवळकर यांचा आरोग्य विभागाकडे आग्रह

रात्रीच्या आरोग्यसेवेचीही रुग्णांची मागणी
चिपळूण (ओंकार रेळेकर) जुलै २०२६ मध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवरील पत्रा उडून गेला. या घटनेनंतर आरोग्य केंद्राच्या इमारतीचे स्वरूप विद्रूप झाले असून, उडालेला पत्रा तातडीने बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. यासाठी रामपूर आरोग्य केंद्र समितीचे सल्लागार अध्यक्ष तथा उमरोली जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निवळकर यांनी रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे.
वादळी वाऱ्यामुळे आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नुकसान झाले असून, त्यानंतर इमारतीची देखभाल व दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य केंद्राच्या इमारतीवरील उडालेला पत्रा पुन्हा बसविण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी प्रमोद निवळकर यांनी केली आहे. इमारतीचे विद्रूप झालेले स्वरूप दूर करून आरोग्य केंद्राची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असा आग्रहही त्यांनी धरला आहे.
रात्रीच्या आरोग्यसेवेची रुग्णांकडून मागणी
दरम्यान, रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात संध्याकाळनंतर रात्रीच्या वेळेतही रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी स्थानिक रुग्णांकडून होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य केंद्रातील सेवा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवरील पत्रा बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासह रात्रीच्या आरोग्यसेवेबाबतही संबंधित विभागाने सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




