ठाकरे शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते शेखर लवेकर यांचा भाजपात प्रवेश
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले स्वागत

चिपळूण (ओंकार रेळेकर)उद्धव ठाकरे शिवसेना पक्षात मागील ३० वर्ष काम करणारे चिपळूण शहरातील खेंड विभागातील विभाग प्रमुख शेखर लवेकर यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा प्रवेश केला.
शहरातील ब्राह्मण साहेब संघ येथे शनिवारी चिपळूण शहर मंडल भाजपा तर्फे मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी,उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने शहरातील मान्यवर, चेअरमन,संचालक यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य सोहळ्यात शेखर लवेकर यांनी भाजपा प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाचे विचार व ध्येयधोरण तसेच जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे नेतृत्व आवडल्यामुळेच मी आज पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला असून पक्ष देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन असे पक्ष प्रवेशाच्या वेळी बोलताना शेखर लवेकर म्हणाले.
लवेकर यांचे शिवसेनेतही उल्लेखनीय काम होते. भविष्यात त्यांना भाजपमध्ये सन्मानच मिळेल. जिथे-जिथे आमची गरज भासेल, तिथे आम्ही पूर्ण ताकदीने शेखर लवेकर यांच्या पाठीशी उभे राहू, असे सांगून शेखर लवेकर यांचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी भाजपमध्ये स्वागत केले.
फोटो : शेखर लवेकर यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करताना जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव,मंगेश तांबे,सौ.स्वप्ना यादव आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)




