Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा द्या : विजय देसाई

◾टोलमाफीसह रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या दरांची तपासणी करा

◾राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक विजय देसाई यांची उद्योगमंत्री ना.उदय सामंत आणि अन्न-औषध प्रशासनाकडे मागणी

चिपळूण (ओंकार रेळेकर)
गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासादरम्यान कोणताही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक विजय संभाजी देसाई यांनी शासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याबरोबरच एस.टी. बसच्या वाढीव तिकिटदरावर नियंत्रण ठेवावे तसेच कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील पॅन्ट्री व्यवस्थेची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात देसाई यांनी उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना पत्र देऊन गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व वाहनांना टोलमाफी करण्याबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती केली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील मोठा सण असून दरवर्षी मुंबई व इतर शहरांतून हजारो कोकणवासीय आपल्या गावी येतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे येणाऱ्या वाहनांना टोलमाफी दिल्यास चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
त्याचबरोबर सणाच्या काळात एस.टी. बसच्या तिकिटांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. काही खासगी बसचालकांकडूनही प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याने गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासीयांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या वाढीव तिकिटदरावर तसेच खासगी वाहतूकदारांकडून आकारण्यात येणाऱ्या भाड्यावर संबंधित यंत्रणांनी नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.
दरम्यान, गणेशोत्सव २०२६ निमित्त कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांमधील पॅन्ट्री व्यवस्थेची तपासणी करण्याची मागणी त्यांनी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि त्यांचे दर यांची तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना दर्जेदार व सुरक्षित खाद्यपदार्थ योग्य दरात मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासाठी कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील पॅन्ट्री तसेच रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी विजय देसाई यांनी केली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर टोलमाफी, प्रवासी भाड्यावर नियंत्रण आणि रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी या तिन्ही बाबींकडे शासन व संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक विजय संभाजी देसाई यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!