महाराष्ट्र

चंद्रकांत जाधव यांच्या निवासस्थानी २१ दिवसीय गणेशोत्सवानिमित्त आज रात्री ‘शक्ती–तुरा जंगी सामना’

शक्तीवाले शाहिर व तु-यावाले शाहिर यांच्यात रंगतदार मुकाबला रंगणार शाहिरी कलेचा थरार

चिपळूण (ओंकार रेळेकर) भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारी सदस्य महाराष्ट्र संघाचे माजी कबड्डी पट्टू चंद्रकांत जाधव यांच्या कडवई पाटीलवाडी निवासस्थानी जाधव कुटुंबीयांचा २१ दिवसीय गणेशोत्सवानिमित्त
सालाबादप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाचे औचित्य साधून ‘शक्ती–तुरा जंगी सामना’ या पारंपरिक शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उद्या रविवार ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वाजता हा सामना रंगणार आहे.गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता कला, संस्कृती आणि लोकपरंपरांना व्यासपीठ देणारा उत्सव म्हणून साजरा केला जातो. याच परंपरेला पुढे नेत जाधव कुटुंबीयांच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या कार्यक्रमात शक्तीवाली शाहिर आणि तु-यावाले शाहिर यांच्यात जंगी सामना होणार असल्याने परिसरातील रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.शाहिरी परंपरेला महाराष्ट्राच्या लोककलेत विशेष महत्त्व आहे.पोवाडे, सवाल-जवाब, सामाजिक संदेश, विनोद आणि उत्स्फूर्त काव्यरचनेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर भाष्य करण्याची या कलेची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. त्यामुळे या जंगी सामन्यात कलाकारांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाचा आणि सवाल-जवाबाच्या रंगतदार मैफलीचा अनुभव रसिकांना घेता येणार आहे.
या कार्यक्रमात कु. वैदेही शेलार, मु. पो. चिंचवली, शेलारवाडी, ता. खेड आणि श्री. विशाल निकम, मु. केतकी, ता. चिपळूण यांच्यासह शाहिरी क्षेत्रातील कलाकार सहभागी होणार आहेत. पारंपरिक वेशभूषा, ढोलकी-ताल, उत्स्फूर्त काव्य आणि सवाल-जवाब यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत येणार आहे.हा कार्यक्रम मु. पो. कडवई, पाटीलवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे. गणेशभक्त, शाहिरी कलेचे रसिक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन जाधव परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
गणपती बाप्पाच्या भक्तिमय वातावरणात पारंपरिक शाहिरी कलेचा हा जंगी सामना रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!