ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी पुढाकार घेणार : दत्ताशेठ लिंगायत
‘गाव तिथे उद्योजक’ उपक्रमाला चिपळूण-संगमेश्वरमध्ये गती!

उद्योग विभाग संयोजकपदी दत्ताशेठ लिंगायत यांची नियुक्ती
चिपळूण (ओंकार रेळेकर)भारतीय जनता पार्टीच्या ‘गाव तिथे उद्योजक’ या महत्त्वाकांक्षी आणि लोकाभिमुख उपक्रमांतर्गत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या उद्योग विभाग संयोजकपदी संगमेश्वर येथील प्रसिद्ध उद्योजक दत्ताराम उर्फ दत्ताशेठ लिंगायत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत असून, ग्रामीण भागात उद्योगांचे जाळे विस्तारण्यासह स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या नियुक्तीनिमित्त खेर्डी, ता. चिपळूण येथील ‘स्वामिनी’ निवासस्थानी दत्ताशेठ लिंगायत यांचे अभिनंदन करून त्यांना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त युवकांनी उद्योग-व्यवसाय क्षेत्रात पुढाकार घ्यावा, त्यांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना द्यावी, असे आवाहन करण्यात आले.




