खेडमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी मंगळवारी तातडीची बैठक
उपनगराध्यक्ष सतीश गणपत चिकणे यांचा पुढाकार; टँकर पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण आणि तात्पुरत्या उपाययोजनांवर होणार चर्चा

खेड : खेड शहरातील पाणीटंचाईच्या गंभीर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी खेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती सतीश गणपत चिकणे यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील सद्यस्थितीतील पाणीटंचाईचा आढावा घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्याकरिता मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता खेड नगरपरिषदेच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी नगराध्यक्ष, नगरपरिषदेचे संबंधित पदाधिकारी तसेच सर्व सन्माननीय नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील विविध भागांत जाणवणारी पाणीटंचाई, पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य वापर यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी कोणत्या तातडीच्या उपाययोजना करता येतील, यावरही विचारविनिमय करण्यात येणार आहे.




